कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच धनंजय मुंडेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.
करुणा मुंडे यांनी यावेळी म्हटलं की, “जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे”. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे असल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. “धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या”, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला.
पुढे त्यांनी म्हटलं की, “त्यामुळे धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही”.