पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. सत्ता असताना त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला नाही. तो देण्याचे काम बिगर काँग्रेस सरकारकडूनच करण्यात आले. डॉ. आंबेडकर संसदेत निवडून येऊ नयेत, यासाठी काँग्रसने प्रयत्न केले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केली. संविधान दिनाला काँग्रेसने विरोध केला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार चालवीत आहेत, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित स्मारकाचे भूमिपूजन आणि विस्तारित इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे, सभागृहनेता गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि अन्य पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. शहर विकासासाठी केंद्र सरकारे कटिबद्ध असून शहरासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचा दावा अमित शहा यांनी या वेळी केला.
शहा म्हणाले, स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारण्याची भीती वाटावी, अशी परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमधील योगदान अमूल्य आहे. संपूर्ण जीवनात त्यांना अवहेलना, अपमान सहन करावा लागला. त्याचा परिणाम त्यांनी घटनानिर्मितीवर होऊ दिला नाही. दलित, आदिवासींबरोबरच प्रत्येक नागरिकाचे अधिकार अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे देशाची राज्यघटना सर्वश्रेष्ठ राज्यघटना ठरली आहे. मात्र त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हयातीमध्ये आणि त्यानंतरही कायम अवमानच केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन सुरू केला मात्र त्यालाही काँग्रेसचा विरोध आहे.
शहर विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध
पुणे शहराच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकार मदत करत आहे. शहरातील तीन मेट्रो मार्गिकांची कामे मोदी सरकारने सुरू केली आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या निधीतून विविध कामे सुरू आहेत. नदी सुधार योजनेसाठी ११० कोटींचा निधी देण्यात आला आहे. स्टार्टअपलाही गती दिली जात आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार काही कमी पडू देणार नाही, असे शहा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. तर उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.