पुणे: ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने (Pat Cummins) आज पावर हिटिंगचा शो दाखवला. आज तो आंद्रे रसेलच्या (Andre Russell) भूमिकेत होता. अवघ्या 15 चेंडूत त्याने नाबाद 56 धावा फटकावल्या. एकवेळ डेंजरस आंद्रे रसेलला स्वस्तात आऊट केल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामना जिंकेल असं वाटलं होतं. पण पॅट कमिन्सने काही चेंडूत खेळच बदलून टाकला. त्याने आयपीएलमध्ये 14 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. आपल्या वादळी खेळीत त्याने चार चौकार आणि सहा षटकार लगावले. 13.1 षटकात आंद्र रसेल बाद झाला. त्यानंतर पॅट कमिन्स मैदानात आला. त्याने 16 व्या षटकात सामनाच संपवून टाकला. आंद्रे रसेलच्या वादळात मुंबई इंडियन्स उद्धवस्त झाली. खरंतर पॅट कमिन्स हा बॉलर आहे. पण त्याच्या चार षटकात 49 धावा फटकावल्या. पोलार्डने त्याच्या शेवटच्या षटकात 23 धावा चोपल्या. त्या सगळ्याची भरपाई कमिन्सने बॅटने केली. 16 व्या ओव्हरमद्ये त्याने 35 धावा चोपल्या.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कमिन्सच्या एकट्याच्या बळावर केकेआरने हा सामना पाच विकेट आणि 24 चेंडू राखून जिंकला. त्याने एका ओव्हरमध्ये चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. केकेआरचा संघ गुणतालिकेत 6 पॉईंटसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सची टीम सलग तिसऱ्या पराभवामुळे नवव्या स्थानावर आहे.
14 ओव्हर पूर्ण झाल्या, त्यावेळी टीमचा स्कोर पाच विकेटवर 115 धावा होता. पॅट कमिन्सच्या बॅटमधून तेव्हा एक चौकार आणि एक षटकार निघाला होता. त्यानंतर बुमराहच्या षटकातील पहिल्या चेंडूवर वेंकटेश अय्यरने झुंजार अर्धशतक झळकावलं. या ओव्हरचा शेवटही कमिन्सने चौकार आणि षटकाराने केला. KKR ला विजयासाठी पाच षटकात 35 धावा हव्या होत्या. क्रीझवर पॅट कमिन्स होता. डॅनियल सॅम्स 16 व षटक टाकत होता. कमिन्सने या ओव्हरमध्ये 35 धावा चोपून चार ओव्हरआधीच मॅच संपवली. या ओव्हरमध्ये त्याने चार षटकार आणि दोन चौकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं.