अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नाग चैतन्य (Naga Chaitanya) ही टॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त झाली. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर समंथा अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. आता समंथाने तिची लग्नातली साडी (Wedding Saree) नाग चैतन्यला परत केल्याचं समजतंय. समंथाने लग्नात नाग चैतन्यची आजी डी. राजेश्वरी यांची साडी परिधान केली होती. हीच साडी तिने आता नाग चैतन्यला परत केल्याचं कळतंय. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अक्किनेनी हे आडनावसुद्धा काढून टाकलं.
समंथाची साडी ही डग्गुबती कुटुंबीयांकडून असल्याने तिने ती परत करण्याचा निर्णय घेतला. नाग चैतन्यची आजी आणि निर्माते डी. रामनायडू यांची पत्नी डी राजेश्वरी यांनी ती साडी परिधान केली होती. तीच साडी समंथाने तिच्या लग्नात परिधान केली होती. त्या साडीबद्दल समंथाने सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली होती. नाग चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या कोणत्याही आठवणी नकोत, म्हणून समंथाने साडी परत करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्यने लग्नगाठ बांधली. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2009 मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नाग चैतन्यची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी समंथा ही अभिनेता सिद्धार्थला तर नाग चैतन्य हा श्रुती हासनला डेट करत होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नाग चैतन्यमध्ये चांगली मैत्री झाली. 2015 मध्ये जेव्हा दुसऱ्या चित्रपटानिमित्त दोघं पुन्हा भेटले, तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये गोव्यात दोघांनी लग्नगाठ बांधली.