राजस्थानने स्मिथला केलं करारमुक्त, नव्या कर्णधाराची केली घोषणा
पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या IPLच्या लिलावाआधी बुधवारी सर्व संघांनी आपले राखून ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेले खेळाडू यांची यादी जाहीर केलीअसता यात सर्वात धक्कादायक निर्णय ठरला तो राजस्थान रॉयल्सचा… त्यांनी त्यांचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यालाच करारमुक्त करून टाकलं. गेल्या हंगामातील त्याचा खराब पफॉर्म ही त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब ठरली. त्यामुळे राजस्थानने अधिकृतरित्या स्मिथला रिलीज केल्याची घोषणा केली. तसेच पुढील हंगामात युवा खेळाडू संजू सॅमसन नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल हेदेखील जाहीर केले. त्यानंतर आता स्टीव्ह स्मिथसाठी लिलावात तीन महत्त्वाच्या संघांमध्ये चुरस दिसून येईल अशी चर्चा रंगली आहे.
चेन्नईच्या संघाचा गेला हंगाम अतिशय खराब गेला. IPL स्पर्धा सुरू झाल्यापासून १३ वर्षांत पहिल्यांदाच CSKला प्ले-ऑफ्समध्ये स्थान मिळवता आले नाही. सुरेश रैनाची अनुपस्थिती, महेंद्रसिंग धोनीचा हरवलेला फॉर्म आणि इतर फलंदाजांची सुमार कामगिरी यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात चेन्नईने ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला निवृत्तीमुळे करारमुक्त केलं आहे. त्यांच्या विदेशी सलामीवीराची जागा रिकामी असून तेथे स्टीव्ह स्मिथसारखा पर्याय उपलब्ध झाल्यास चेन्नईचे ताकद नक्कीच वाढेल.
बंगळुरूच्या संघाने पहिल्या १२ हंगामांपेक्षा गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी चांगली लय राखली. नवखा सलामीवीर देवदत्त पडीकल याने संघाला चांगली सुरूवात देण्यात मदत केली. पण संघाने नव्याने विकत घेतलेल्या आरोन फिंचला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यंदा बंगळुरू संघाने फिंचला करारमुक्त केले. अशा परिस्थितीत विदेशी सलामीवीराचा पर्याय बंगळुरूच्या संघासाठीही खुला असून तेथे स्मिथ खेळणार असेल तर संघाच्या फलंदाजीचा स्तर प्रचंड वाढेल. तशातच स्मिथला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराट गप्प केल्याचा किस्सा पाहता विराट आणि स्मिथ यांच्यात एक चांगली मैत्रीदेखील पाहायल मिळू शकते.
दिल्लीच्या संघाने गेल्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. पण मोक्याच्या क्षणी त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दिल्लीच्या संघाकडे शिखर धवन, मार्कस स्टॉयनीस, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल असे सहा फलंदाज आहेत. परंतु पृथ्वी शॉ च्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या संघात सलामीवीराची जागा एखाद्या अनुभवी खेळाडूला दिली जाऊ शकते. दिल्लीने शेवटच्या सामन्यांमध्ये स्टॉयनीसला सलामीला पाठवलं होतं पण त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत स्टीव्ह स्मिथसारखा अनुभवी फलंदाज ताफ्यात दाखल झाला तर दिल्लीच्या संघाला स्थैर्य देण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.