मुंबई, 11 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) आता आठवभरावर आली असताना या स्पर्धेतून खेळाडूंनी माघार घेण्याचं सत्र सुरू झालं आहे. टी 20 क्रिकेटमधील नंबर 1 बॅट्समन आणि पंजाब किंग्जचा खेळाडू डेव्हिड मलान (Dawid Malan) यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडच्या आणखी दोन खेळाडूंनी माघार घेतल्याचं वृत्त आहे. सनरायझर्स हैदराबादचा विकेट किपर बॅट्समन जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि दिल्ली कॅपिटल्सचा फास्ट बॉलर ख्रिस वोक्स (Chris Wokes) यांनी देखील या स्पर्धेतून माघार घेतल्याचं वृत्त ब्रिटीश मीडियानं दिलं आहे. यापैकी जॉनी बेअरस्टोची माघार हा सनरायझर्स हैदराबादसाठी (SRH) मोठा धक्का आहे. बेअरस्टोनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 41.33 च्या सरासरीनं 248 रन केले होते. फॉर्मात असलेल्या बेअरस्टोला खेळवण्यासाठी सनरायझर्सनं माजी कॅप्टन डेव्हिड वॉर्नरला (David Warner) बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला होता.आता बेअरस्टोनं माघार घेतल्यानं वॉर्नर पुन्हा खेळेल असं मानलं जात आहे. हैदराबादची टीम 7 मॅचमध्ये फक्त 1 विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे. पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सलाही (DC) आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धक्का बसला आहे. दिल्लीचा फास्ट बॉलर ख्रिस वोक्सनं माघार घेतल्याची माहिती आहे.वोक्स दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानं भारताविरुद्ध ओव्हल टेस्टमध्ये पुनरागमन केलं होतं. ओव्हल टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव झाला असला तरी वोक्सच्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केले होते. मात्र वोक्सनंही आयपीएलमधून माघार घेतली आहे. मलान, बेअरस्टो आणि वोक्स यांनी आयपीएलमधून माघार घेतल्यानं या स्पर्धेतील इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या आता 10 उरली आहे. राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या इंग्लंडच्या खेळाडूंनी यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतली आहे.