मुंबई : आयपीएल 2021 दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यापासून दूर राहिला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. रोहितच्या अनुपस्थितीत किरन पोलार्डने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात संघाची कमान सांभाळली. रोहितच्या अनुपस्थितीचे कारण सामन्यादरम्यान समोर आले. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धनेने सांगितलं की, ‘रोहितला शेवटच्या कसोटीत (ओव्हल) काही किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे आम्हाला वाटले की आणखी दोन दिवस अतिरिक्त खबरदारी घ्यावी. त्यामुळे त्याला मॅचमध्ये खेळवलं नाही’. जयवर्धनेच्या स्पष्टीकरणानंतर रोहितची दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. तसंच तो पुढच्या काही सामन्यांना देखील मुकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.
रोहित शर्मा काही सामन्यांना मुकणार, मुंबई इंडियन्ससमोरच्या अडचणी वाढणार?
रोहित शर्माला अलीकडेच इंग्लंड दौऱ्यात गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली होती. इंग्लंडविरुद्ध द ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले. पण जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा तो मैदानावर आला नाही. अलीकडच्या काळात रोहित सतत दुखापतींशी झुंज देत आहे. आयपीएल 2020 दरम्यान, तो हॅमस्ट्रिंग स्ट्रेचवर बसला होता. यामुळे तो अनेक सामन्यांपासून दूर होता. त्यानंतर त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास विलंब झाला. आयपीएल संपल्यानंतर लगेचच टी -20 विश्वचषक सुरू होत असल्याने, रोहित शर्मा लगोलग पुनरागमन करण्याची घाई करणार नाही.
चेन्नईकडून मुंबईचा पराभव
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकी खेळीनंतर ड्वेन ब्राव्हो आणि दीपक चहरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. या विजयासह सीएसकेने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. या मोसमातील आठ सामन्यांतील चेन्नईचा हा सहावा विजय आहे. मे महिन्यात आयपीएलमध्ये कोविड केसेस समोर आल्यानंतर भारतात सीझन स्थगित झाल्यानंतर यूएईमध्ये हा पहिला सामना होता.
चेन्नईच्या 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ब्राव्हो (25 धावांत 3) आणि दीपक (19 धावांत 2) यांच्या धारदार गोलंदाजीसमोर आठ बाद 136 धावाच करू शकला. चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडची (नाबाद 88) कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी, रवींद्र जडेजासह (26) पाचव्या विकेटसाठी 81 आणि ब्राव्होसह (आठ चेंडूंत 23 रन्स) सहाव्या विकेटसाठी 39 धावा केल्या.