अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. अंमली पदार्थ कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना रविवारी अटक केली. या प्रकरणी आर्यन खानला येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणानंतर बॉलिवूडकरांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने शाहरुखला समर्थन दिले आहे. “आर्यन खान हा चांगला मुलगा आहे,” असे ट्वीट सुझानने केले आहे.
सुझान खानने शाहरुख खान आणि गौरी खानला पाठिंबा दिला आहे. सुझान खानच्या ट्वीटनुसार, “मला असे वाटते की, हे आर्यन खानबद्दल नाही. कारण तो दुर्दैवाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता. त्यामुळे बॉलिवूडच्या विरोधात असणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण असू शकतो. हे फार वाईट आणि चुकीचे आहे. कारण तो एक गुणी मुलगा आहे आणि या प्रकरणात शाहरुख आणि गौरीला माझा पूर्ण पाठिंबा आहे,” असे तिने सांगितले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकारांनी शाहरुखला फोन करत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यावर जाऊन त्याची भेट घेतली. रात्री जवळपास ११.३० वाजता सलमान खान शाहरुखच्या घरी पोहोचला. यावेळी त्याने शाहरुखला धीर देण्याचा प्रयत्न केला. या दरम्यानचे अनेक फोटो सध्या व्हायरल झाले.
इतकंच नव्हे तर पूजा भट्ट, सुनिल शेट्टी, सुचित्रा कृष्णमुर्ती या कलाकारांनी शाहरुखला जाहीर समर्थन दिले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर #WeStandWithSRK असा टॅगही सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
#WeStandWithSRK सोशल मीडियावर ट्रेंड
अभिनेत्री पुजा भट्ट ही ट्वीट करत मी तुझ्या सोबत असल्याचे सांगितले आहे. “या कठीण प्रसंगी मी तुझ्यासोबत आहे. तुला याची गरज नसली तरी मला आहे. ही वेळही निघून जाईल,” असे ट्वीट पुजा भट्ट हिने केले आहे.
तर सुचित्रा कृष्णमुर्ती म्हणते, “अशाप्रकारे कोणाच्या मुलाला अडचणीत पाहून खूप वाईट वाटते. मनोरंजन विश्वातील लोकांचे जीवन कसे इतरांसाठी मनोरंजनाचे एक साधन बनले आहे, हे यातून स्पष्ट दिसत आहे. आजकाल जो कोणी बॉलिवूडवर निशाणा साधत आहे. एनसीबीकडून होणारी सर्व छापेमारी ही फक्त चित्रपट कलाकारांवरच होते. पण यातून काहीही साध्य होत नाही,” असा टोलाही तिने लगावला.