चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आधी प्लेऑफचे तिकीट मिळवल्यानंतर चेन्नईचे सर्वात आधी प्रथम अंतिम फेरीचे तिकीटही मिळवले. रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या जुन्या शैलीत पुन्हा पाहायला मिळाला. त्याने आधीसारखीच संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली.
धोनीने सहा चेंडूत नाबाद १८ धावा केल्या आणि संघाला षटकार आणि चौकारांसह अविस्मरणीय विजय मिळवून दिला. धोनीने विजयी फटका मारताच त्याची पत्नी साक्षी धोनीचे डोळे भरून आले. यावेळी साक्षीसह झिवाही स्टेडियममध्ये उपस्थित होती. धोनीने विजयी फटका मारताच साक्षीने झिवाला घट्ट मिठी मारली. धोनीच्या पत्नी आणि मुलीचे हे सेलिब्रेशन प्रचंड व्हायरल होत आहे.
महेंद्रसिंग धोनी मैदानावर आला तेव्हा संघाला ११ चेंडूत २३ धावांची गरज होती. महेंद्रसिंग धोनीने षटकार आणि चौकार ठोकण्यास सुरुवात करताच दिल्लीच्या चाहत्यांना धक्का बसला. कारण धोनी दिल्लीच्या गोलंदाजांवर अजिबात दया दाखवत नव्हता. तसेच धोनीला त्याच्या जुन्या शैलीत खेळताना पाहून चेन्नईचे चाहतेही खूष झाले.
जेव्हा धोनीने षटकार आणि चौकार मारण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याची पत्नी साक्षी धोनीही भावूक दिसत होती.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या. पृथ्वी शॉने ६० धावा केल्या, तर कर्णधार ऋषभ पंतने नाबाद ५१ धावा केल्या. या दोघांशिवाय शिमरॉन हेटमायरने ३७ धावा केल्या. चेन्नईकडून जोश हेझलवूडने ४ षटकांत २९ धावा देऊन दोन बळी घेतले. रवींद्र जडेजा, मोईन अली आणि डीजे ब्राव्होने प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरादाखल चेन्नईची सुरवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर फाफ डु प्लेसिस १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी ११० धावांची भागीदारी केली.