आयपीएल २०२१च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला हरवत आयपीएलचे चौथे जेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सनंतर आयपीएलचे सर्वाधिक जेतेपदे जिंकणारा चेन्नई दुसरा संघ ठरला. मुंबईने आयपीएलची पाच विजेतेपदे जिंकली आहेत. पण यंदाच्या विजेतेपदासह चेन्नईने एक खास विक्रम नावावर केला, जो इतर कोणालाही करता आलेला नाही.
चेन्नईने आता आयपीएल सुरू झाल्यापासून प्रत्येक दशकात जेतेपद पटकावण्याचा खास विक्रम नोंदवला आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद जिंकले होते. २०१० मध्ये चेन्नईने आपले पहिले जेतेपद जिंकले. त्यानंतर २०११ आणि २०१८मध्ये चेन्नईने जेतेपदांची हॅट्ट्रिक साजरी केली. आता या नव्या दशकाची सुरुवात चेन्नईने विजेतेपदासह केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व विजेतेपदांमध्ये चेन्नईची कमान धोनीच्या हाती होती.
असा रंगला सामना…
फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणासोबत उपयुक्त गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज, उथप्पा आणि मोईन अलीची योग्य साथ मिळाली.
प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी ९१ धावांची दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीत फलंदाजांनी घेतलेल्या दबावामुळे कोलकाता आपल्या तिसऱ्या जेतेपदापासून लांब राहिली. त्यांना २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले. डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.