आगामी म्हणजेच २०२२ च्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएलच्या) पर्वासाठी संघांनी कोणते खेळाडू रिटेन करणार आहेत याची यादी जाहीर केलीय. मंगळवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या चार खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा समावेश आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे कर्णधार धोनीपेक्षा चेन्नईच्या व्यवस्थापनाने जडेजासाठी अधिक पैसे मोजले आहेत. त्यामुळेच आजपर्यंत चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या धोनीची ही ओळखही आता पुसली गेलीय.
रविंद्र जडेजा आता चेन्नईसाठीचा सर्वात महागडा खेळू ठरला आहे. तसेच रिटेन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आतापर्यंत पहिली पसंती असणारा धोनी यंदा मात्र चेन्नईच्या संघाची पहिली पसंती नव्हता. चेन्नईच्या संघाने आधी रविंद्र जडेजाची निवड रिटेन केला जाणारा फर्स्ट चॉइस म्हणून केली. त्यानंतर त्यांनी धोनीला संघात स्थान दिलं
चेन्नईच्या संघाने महेंद्र सिंग धोनीला १२ कोटींच्या किंमतीला रिटेन केलं आहे. तर जडेजासाठी चेन्नईने १६ कोटी मोजलेत. म्हणजेच जडेजाला संघात घेण्यासाठी चेन्नईने धोनीच्या तुलनेत चार कोटी रुपये अधिक मोजले आहेत. याशिवाय चेन्नईने ऋतूराज गायकवाडलाही संघात रिटेन केलं आहे. परदेशी खेळाडू रिटेन करण्याची संधी म्हणून चेन्नईच्या संघाने इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला रिटेन केलं आहे.
ऋतूराज गायकवाड हा आयपीएलच्या २०२१ च्या पर्वातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने एक शतक आणि चार अर्धशतकांच्या जोरावर एकूण ६३५ धावा केल्या होता. चेन्नईचाच फाप डुप्लेसी हा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने ६३३ म्हणजेच ऋतूराजपेक्षा केवळ दोन धावा कमी केल्या होत्या.
ऋतूराजला त्याच्या या कामगिरीचं बक्षिस त्यानंतरच्या श्रीलंकन मालिकेसाठी निवड झाल्याने मिळालं होतं. त्याला संघामध्ये स्थानही मिळालं होतं. मात्र त्याला या मालिकेत फारचा प्रभाव पाडता आला नाही. या मालिकेतील दोन टी-२० सामन्यांमध्ये ऋतूराजने एकूण ३५ धावा केल्या होत्या. मागील पर्वामध्ये ४० लाखांची बोली लागलेल्या ऋतूराजला यंदा सहा कोटींना रिटेन करण्यात आलंय.