मुंबई : IPL 2022 च्या मेगा लिलावात 49 खेळाडूंना 2 कोटींच्या बेस प्राइस असलेल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner), भारतीय फिरकीपटू आर. अश्विन (R Ashwin), दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांच्या नावांचाही समावेश आहे. डेव्हिड वॉर्नर गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात मालिकावीर ठरला होता. त्याच्याशिवाय फायनलमध्ये सामनावीर म्हणून निवडलेला मिचेल मार्शदेखील या यादीत आहे, ज्याची बेस प्राइस 2 कोटी आहे.
दरम्यान, काही खेळाडू असे आहेत की, ज्यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे, मात्र त्यांना 2 कोटी बेस प्राईस असलेल्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालेलं नाही. यामध्ये बेन स्टोक्स, ख्रिस गेल, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि मिचेल स्टार्क यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी यापूर्वी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, तरीही या मेगा ऑक्शनमध्ये त्यांच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ झाली नाही.
IPL 2022 च्या मेगा ऑक्शनसाठी जाहीर केलेल्या बेस प्राइस 2 कोटी असलेल्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट 49 खेळाडूंपैकी 17 भारतीय आहेत तर 32 परदेशी खेळाडू आहेत. भारताकडून अश्विनशिवाय श्रेयस अय्यर, शिखर धवन, इशान किशन, सुरेश रैना यांची नावे यात आहेत. वॉर्नर, रबाडा, ब्राव्हो व्यतिरिक्त पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वूड, ट्रेंट बोल्ट आणि फाफ डू प्लेसिस अशी मोठी नावे परदेशी खेळाडूंच्या यादीत आहेत.
IPL 2022 च्या मेगा ऑक्शनसाठी 1214 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे. यात 41 असोशिएट देशांतील 270 कॅप्ड आणि 312 अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश आहे. या सर्व खेळाडूंची यादी 10 फ्रँचायझींना पाठवण्यात आली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायझींनी निवडलेली नावे बोलीसाठी मांडली जातील.