मुंबई : कोलकाता नाइट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १५व्या हंगामाची विजयी सलामी दिली. त्यांनी शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी आणि नऊ चेंडू राखून सरशी साधत नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वपर्वाचा विजयारंभ केला.
अनुभवी मुंबईकर सलामीवीर अजिंक्य रहाणेच्या (३४ चेंडूंत ४४ धावा) फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने चेन्नईने दिलेले १३२ धावांचे आव्हान १८.३ षटकांत गाठले. तसेच या विजयासह कोलकाताने गेल्या वर्षी अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेडही केली. कोलकाताचे सलामीवीर रहाणे आणि वेंकटेश अय्यर (१६) यांनी डावाची उत्तम सुरुवात केली. त्यानंतर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रहाणेला नितीश राणाची (२१) साथ लाभली. रहाणेचे अर्धशतक सहा धावांनी हुकले. मात्र, कर्णधार श्रेयस (नाबाद २०) आणि सॅम बिलिंग्स (२५) यांनी चांगली फलंदाजी करत कोलकाताला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १३१ अशी धावसंख्या उभारली. चेन्नईच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. मागील हंगामात ‘ऑरेंज कॅप’ पटकावणारा महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड खातेही न उघडता बाद झाला. तसेच न्यूझीलंडचा डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेलाही (३) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. या दोघांनाही वेगवान गोलंदाज उमेश यादवने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
एका बाजूने फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूने रॉबिन उथप्पाने आक्रमक शैलीत खेळताना २१ चेंडूंत २८ धावा फटकावल्या. मात्र, फिरकीपटू वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर डाव्या यष्टीबाहेरील चेंडूवर उथप्पाला शेल्डन जॅक्सनने अप्रतिमरीत्या यष्टीचित केले. अंबाती रायडू (१५) आणि मुंबईकर शिवम दुबे (३) हेसुद्धा अपयशी ठरल्याने चेन्नईची ५ बाद ६१ अशी स्थिती होती. त्यानंतर धोनी (३८ चेंडूंत नाबाद ५०) आणि कर्णधार रवींद्र जडेजा (२८ चेंडूंत नाबाद २६) यांनी चेन्नईला सावरले. चेन्नईच्या १०० धावा फलकावर लागण्यासाठी १८.३ षटके लागली. मात्र, त्यानंतर विशेषत: धोनीने कोलकाताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. कर्णधारपदाच्या दडपणाविना खेळणाऱ्या धोनीने अखेरच्या दोन षटकांत तीन चौकार आणि एक षटकार खेचत ३८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ५ बाद १३१ (महेंद्रसिंह धोनी नाबाद ५०, रॉबिन उथप्पा २८; उमेश यादव २/२०) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.३ षटकांत ४ बाद १३३ (अजिंक्य रहाणे ४४, सॅम बिलिंग्ज २५; ड्वेन ब्राव्हो ३/२०)
’ सामनावीर : उमेश यादव
वानखेडे की चेपॉक?
चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील ‘आयपीएल’चा सलामीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. मात्र, स्टेडियममधील प्रेक्षकांवर नजर टाकल्यास हा सामना नक्की वानखेडेवर सुरू आहे की चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये (चेपॉक) असा प्रश्न पडत होता. या सामन्यासाठी केवळ २५ टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये परवानगी होती आणि यापैकी बहुतांश चाहते हे चेन्नईच्या पिवळय़ा रंगाचे कपडे परिधान करून होते. त्यांनी ‘धोनी..धोनी’चा नाराही दिला.