मुंबई : गेल्या दोन -अडीच महिन्यांपासून रंगभूमी बंद आहे. त्याआधी व्यावसायिक पातळीवर नाटकं होत होती. प्रशांत दामले, भरत जाधव यांची नाटकं सुरू झाली होती. प्रेक्षकही त्याला प्रतिसाद देत होते. पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा रंगभूमीवर शांतता पसरली. पुढे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असतानाच लसीकरणानेही राज्यात वेग पकडला आहे. याचं फलित म्हणूनच आता हळूहळू अनेक गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. पण त्याला नाटक हे अपवाद का असावं? म्हणून राज्यातल्या आघाडीच्या रंगकर्मींंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाटकं सशर्त सुरू करण्याची विनंती केली आहे.
या पत्रात अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. याबद्दल माहिती देताना रंगकर्मी अभिजीत झुंजारराव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, हे पत्र आम्ही लिहिलं आहे. आता अनेक गोष्टी पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. नाटक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्याअर्थाने आता सशर्त का असेना पण नाटक सुरू होणं आवश्यक आहे. म्हणूनच हे पत्र लिहिलं आहे. इमेल द्वारे हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदय नक्कीच याचा सह्रदयतेनं विचार करतील याची खात्री वााटते. '
या पत्रात अनेक गोष्टी नमूद करण्यात आलं आहे. या पत्रात म्हटलं आहे, राज्य सरकारपुढे सध्या अनेक गोष्टी आहेत हे आम्ही जाणतो. सध्या शिक्षणाबाबतही शाळांना, कॉलेजांना कुलुप आहे. पण अनेक गोष्टी आता पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. गेल्या दीड वर्षापासून अनेक गोष्टी बंद आहेत. त्याचा आपल्या आर्थिक गोष्टींवर परिणाम झाला आहे, शिवाय, समाजाची मानसिक गोष्टही फार महत्वाची आहे. मानसिक आरोग्यासाठी नाटकाची गरज आहे. पूर्ण नाटकासाठी निदान 50 टक्के आसनक्षमतेच्या नाट्यगृहांना आणि त्या आसनक्षमते प्रयोग करण्याला परवानगी मिळावी अशी विनंती या पत्रात करण्यत आली आहे.
रंगकर्मी अतुल पेठे, शंभू पाटील, वामन पंडित, दत्ता पाटील, अभिजीत झुंजारराव, अनिल कोष्टी यांची नावं आहेत. ही सर्व मंडळी राज्याच्या विविध कोपऱ्यात प्रायोगिक रंगभूमीसाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. हे पत्र राज्यातल्या विविध प्रयोगिक संस्थांच्या व्हाट्सअप ग्रुपवर वेगाने व्हायरल झाला आहे. अनेकांनी हे पत्र सोशल मीडियावरही पोस्ट केलं आहे. जेणेकरून हा मुद्दा राज्य सरकारच्या निदर्शनास यावा हा त्यामागचा हेतू आहे.
फॉरवर्ड झालेलं पत्र असं,
माननीय उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
सप्रेम नमस्कार.
आमचे हे पत्र तुमच्या पर्यंत पोहोचेल की नाही कल्पना नाही. आम्ही सारे प्रायोगिक नाटक करणारे कलावंत आहोत. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. त्याकरता आपला देश आणि आपले राज्य आपापल्या पातळीवर उपायही करू पाहात आहे. या संकटातून बाहेर पडण्याकरता इथल्या नागरिकांनीही आपापल्या मगदुराप्रमाणे मदत केली आहे. त्यात आम्हीही आपापल्या कुवतीने मदत केली आहे. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे हेही आम्हाला कळत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे हेही आम्ही जाणत आहोत. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबतही आम्ही सहमत आहोत. पण हे सर्व आता दीड वर्ष सुरू आहे. आधीपेक्षा आता थोडीफार सुधारणा होत आहे. लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे. लोक आता हॉटेलात काही दिवस का होईना, पण जाऊन जेवूखाऊ लागलेले आहेत.*
बदलत्या या चित्रात सर्वांनी कोविडची काळजी घेणं अर्थातच आवश्यक आहे. त्याबाबत सतत जनजागृती होणं गरजेचं आहे. या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ 25/30लोकांसमोर आम्ही काही लोकांनी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा 'थिएटर' ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा आम्ही अनुभव घेतला आहे.
आपणांस नम्र विनंती अशी की निदान 50 लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला आपण परवानगी द्यावीत. यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला नक्की मदत होईल.*
कृपया आमच्या या रंगभूमीच्या प्रातिनिधिक पत्राचा आपण गंभीरपूर्वक विचार करावा ही विनंती.
कोरोनाविरुद्धच्या या संकटात आमची साथ होतीच आणि पुढेही असेलच.
कळावे,