टॉलिवूड गाजवल्यानंतर बॉलिवूडकडे पावलं वळविणारा अभिनेता म्हणजे धनुष.
'रांझना' या चित्रपटातून धनुषने त्याच्या अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवत प्रेक्षकांवर आपली छाप सोडली.
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप सोडणाऱ्या धनुषचा आज वाढदिवस.
टॉलिवूड आणि बॉलिवूड गाजवणाऱ्या धनुषचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यातच तो दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आहे.
मात्र रजनीकांत यांचा जावई ही ओळख मिळवण्याची कहाणी म्हणजेच धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याची लव्हस्टोरीही एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे आहे.
२०१३ मध्ये 'रांझना'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा धनुष हा केवळ उत्तम अभिनेताच नव्हे तर तो एक चांगला गायक देखील आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं 'व्हाय दीस कोलावरी डी' हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं.
धनुष आणि ऐश्वर्या यांच्याकडे टॉलिवूडमधील मोस्ट रोमॅण्टिक कपल म्हणून पाहिलं जातं. परंतु, यांची लव्हस्टोरीही एकदम हटके आहे.
२००२ मध्ये 'कडहाल कोंडेन' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी ऐश्वर्या आणि धनुष यांची पहिली भेट झाली.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत आली होती. त्यावेळी धनुषचा परफॉर्मन्स पाहून ती त्याचक्षणी त्याच्या प्रेमात पडली होती.
विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं.
ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
२००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं.
धनुष आणि ऐश्वर्याचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक आहे.
ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. मात्र ते म्हणतात ना प्रेमाला कसलंही बंधन नसतं त्याप्रमाणे यांच्या लव्हस्टोरीत वय आडवं आलं नाही.
ऐश्वर्या आणि धनुषला लिंगा राजा आणि यात्रा राजा ही दोन मुलं आहेत.
ऐश्वर्या एक उत्तम नर्तिका असून तिने शास्त्रीय नृत्याचे धडे घेतलेत.