भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. आता मीराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मीराबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा एक मणिपुरी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मीराबाई यांचा जीवनातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. मीराबाई यांनी चित्रपटासाठी होकार दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच या संदर्भात मीराबाई आणि एका चित्रपट प्रोडक्शन कंपनीमध्ये बोलणे देखील झाल्याचे म्हटले जात आहे.
या प्रोडक्शन कंपनीचे अध्यक्ष मनाओबी एमएम यांनी चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे. तसेच मीराबाई चानू यांची भूमिका साकारण्यासाठी आम्ही एका मुलीच्या शोधात आहोत असे देखील त्यांनी म्हटले आहे.
मीराबाई चानू यांना वेटलिफ्टिंगच्या ४९ वजनाच्या गटात रौप्य पदक मिळाले आहे. सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे.