सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीन बिग बॉस ओटीटीमध्ये दणक्यात एन्ट्री करण्यास सज्ज झालीय. बोल्ड आणि बिनधास्त नेहा भसीन या शोमध्ये येण्यावरून बरीच चर्चा सुरूये. नेहासाठी बिग बॉसचा हा मंच नवा आहे. त्यामूळे या शोबद्दल जाणून घेण्यासाठी नेहा भसीनने बिग बॉसचा माजी स्पर्धक राहुल वैद्यला कॉल केला.
एका माध्यमासोबत बोलताना नेहा भसीनने हा खुलासा केलाय. यावेळी बोलताना ती म्हणाली, “राहुल वैद्यने यापूर्वी बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे हा गेम कसा खेळायचा याचा त्याला अनुभव आहे. त्यामुळे मी राहुल वैद्यला फोन केला. पण काय बोलणं झालं ते मी सांगू शकत नाही. मी या शोमध्ये भाग घेऊ की नको हे मला कळत नव्हतं. म्हणून मला त्याचा सल्ला घ्यायचा होता. त्याच्या दृष्टीकोनातून यात माझा फायदा आहे की नुकसान हे जाणून घ्यायचं होतं. हे सगळं विचारल्यानंतर त्याने मला सांगितलं की तुझा निर्णय आहे तो. पण तोपर्यंत मी या शोसाठी होकार कळवला होता.”
नेहा भसीनने यापूर्वी कधीच बिग बॉस शो पाहिला नाही. फक्त काही क्लिप्स पाहून ती या शोमध्ये एन्ट्री करतेय, असं ती म्हणाली. या शोचा कोणताच पूर्ण एपिसोड तिने पाहिलेला नाही. जर बिग बॉसचे पूर्ण एपिसोड्स पाहिले असते तर कदाचित ती या शोमध्ये येण्याचा निर्णय घेऊ शकली नसती, असं देखील तिने या मुलाखतीत म्हटलंय.
बिग बॉस १५ मध्ये आल्यानंतर भांडणांचा सामना कसा करणार असा प्रश्न विचारल्यानंतर नेहा म्हणाली, “संपूर्ण दिवस तर भांडणं होणार नाहीत ना…पूर्ण दिवस कसं कोणी भांडू शकतं? जर कधी स्टॅंड घेण्याची वेळ आली तर मी ते घेणारंच. ते माझ्याकडून आपोआपच होईल. मी ती व्यक्ती नाही, जिला कोणीही मुर्ख बनवू शकतं. समोरच्या व्यक्तीला अपमानित न करता मी माझं मत मांडू शकते.”
बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट गायिका नेहा भसीन बिग बॉस शोमध्ये धमाका करणार आहे. प्रोमो व्हिडीओमध्येच तिने स्पष्ट केलंय की तिचा स्वभाव कोणापुढे झुकण्याचा नाही. ‘स्वॅग से स्वागत’, ‘दिल दिया गलान’, ‘जग घुमिया’ आणि ‘चशनी’ सारखी बॉलिवूड हिट गाणी देणारी नेहा मूळची दिल्लीची आहे. वयाच्या ९ व्या वर्षीपासून ती गायन क्षेत्रात आपलं नाव कमवत आहे. ती सुप्रसिद्ध पॉप गायकांचा ग्रुप ‘विवा’ ची सदस्य राहिली आहे. नेहा विवाहित आहे. तिने 23 ऑक्टोबर 2016 रोजी इटलीमध्ये संगीतकार समीर उद्दिनशी लग्न केलंय. त्यामुळे आता तिला बिग बॉस १५ मध्ये पाहण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक झाले आहेत.