बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे.
हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे.
पती हनी सिंग तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक, शाब्दिक, मानसिक छळासोबतच अत्याचाराला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे शालिनीने म्हटले आहे.
शालिनीने हनी सिंगविरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला असून १० कोटींच्या भरपाईचा दावा केला आहे.
शालिनीने "मला एखाद्या प्राण्यासारखी क्रूरपणे वागणूक देण्यात आली" असं म्हणत कुटुंबियांवर आरोप केले आहेत.
शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत तिने हनी सिंगच्या वडिलांवर म्हणजेच तिच्या सासऱ्यांवर देखील काही धक्कादायक आरोप केले आहेत. ती म्हणाली, "एकदा सासरे दारुच्या नशेत मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवला."
हनी सिंगची पत्नी शालिनी तलवराने गेल्या काही वर्षात तिला पती हनी सिंगने अनेकदा मारहाण केल्याचा दावा केलाय. तसंच सासरच्या कुटुंबाकडून तिला सतत धमकी दिली जात असल्याने ती गेल्या काही वर्षांपासून सतत भीतीखाली जगत असल्याचं तिचं म्हणणं आहे.
शालिनेने दाखल केलेल्या याचिकेत तिला गेल्या १० वर्षांपासून कशा प्रकारे हिंसाचाराचा सामना करावा लागला याबद्दल तिने सांगितलं आहे.
तसंच हनी सिंगने इतर अनेक महिलांसोबत अनैतिक संबध ठेवल्याचं ती म्हणालीय. हनी लग्नाची अंगठी न घालता अनेक महिलांसोबत संबध ठेवत होता. शिवाय लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्याने मारहाण केली असल्याचं शालिनी म्हणाली.
"मानसिक छळ आणि सततच्या क्रूर वागणूकीमुळे नैराश्याचा सामना करावा लागला होता. यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागली" असं शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.
शालिनीने तक्रारीमध्ये हनी सिंगवर इतरही काही गंभीर आरोप केले आहेत. हनी सिंगने मानसिक छळाबरोबर आपला शारीरिक छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. शालिनीने हनी सिंगबरोबरच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले आहेत. शालिनीने न्यायालयाला विनंती केली की, तिच्या आणि हनी सिंगच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या विक्रीवर देखील बंदी घालण्यात यावी.
शालिनीच्या आरोपांवर आत्तापर्यंत मौन पाळलेल्या हनी सिंगवनं अखेर मौन सोडून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हनी सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये शालिनीने केलेले सगळे आरोप खोटे असल्याचे हनी सिंगने म्हटले आहे. "२० वर्षापासून शालिनी तलवार माझी पत्नी आहे. त्याच शालिनीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. हे सगळे आरोप ऐकून मला दु:ख झालं आहे", असं हनी सिंगनं म्हटलं आहे.
"भूतकाळात माझ्या गाण्यांवर आणि माझ्या आरोग्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टींवरून माझ्यावर टीका करण्यात आल्या, तरी मी कधीही प्रेस नोट किंवा कोणतीही पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावेळी शांत राहून काही होणार नाही असं मला वाटलं, कारण यावेळी माझ्या वृद्ध पालकांवर आणि धाकट्या बहिणीवर…जे माझ्या वाईट परिस्थितीत माझ्यासोबत होते त्यांच्यावर आरोप केले आहेत. हे सगळे आरोप बदनाम करणारे आहेत," असे देखील हनी सिंगने नमूद केलं आहे.
पुढे हनी सिंग म्हणाला, "मी गेल्या १५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे आणि देशभरातील कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या टीममध्ये गेल्या १० वर्षांपासून जे लोक आहेत, त्यांना माझे आणि माझ्या पत्नीचे संबंध कसे आहेत याबद्दल माहिती आहे. ती प्रत्येक चित्रीकरणाला, कार्यक्रमाला आणि मीटिंगमध्ये सोबत असते. या सगळ्या आरोपांचे मी खंडन करतो पण मी यावर काही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल."
हनी सिंगने आपल्या चाहत्यांना देखील आवाहन केलं आहे. "मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो की जोपर्यंत न्यायालय दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेत नाही तोपर्यंत माझ्या आणि माझ्या कुटुंबाविषयी कोणतेही निष्कर्ष काढू नका. मला विश्वास आहे की न्याय नक्कीच मिळेल आणि सत्य कधी ही लपत नाही. जो खरं बोलत असेल तो जिंकेल", असं हनी सिंगनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हनी सिंग आणि शालिनी यांनी २०११मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते एकमेकांना जवळपास २० वर्षे ओळखत होते.
हनी सिंग आणि शालिनी यांनी दिल्ली येथील फार्म हाऊसवर लग्न केले होते. पण त्यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती होती.
हनी सिंग आणि पत्नी शालिनी या दोघांची अगदी शाळेपासूनची मैत्री होती.
दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि प्रेमाचं नातं त्यांनी लग्नगाठ बांधून आणखी घट्ट केलं.
मध्यंतरी हनी सिंग आजारपणामुळे इंडस्ट्रीमधून दूर झाला होता. त्याच्या त्या कठीण प्रसंगात पत्नी शालिनीने त्याला मोठा आधार दिला होता.
काही दिवसांपूर्वी हनी सिंगचं नाव अभिनेत्री डियाना उप्पलशी जोडलं गेलं होतं. पण या सर्व अफवा असल्याचं नंतर हनी सिंगने स्पष्ट केलं.
(सर्व फोटो सौजन्य : हनी सिंग / इन्स्टाग्राम)