बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगरची बहीण कृष्णा श्रॉफ बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. टायगरप्रमाणेच कृष्णादेखील फिटनेस प्रेमी असून वर्कआउट करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय बोल्ड फोटोंमुळे कृष्णा अनेकदा चर्चेत आलीय. नुकत्याच केलेल्या एका अंतर्वस्त्राच्या जाहिरातीमध्ये कृष्णाने एका गोष्टीचा खुलासा केलाय. बालपणापासून एका असुरक्षिततेचा सामना करावा लागल्याचा खुलासा कृष्णाने केलाय.
नुकतीच कृष्णाने एक अंतर्वस्त्राची जाहिरात केलीय. या जाहिरीतीचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात टायगर प्रत्येक गोष्टीत चमकत गेला तर मी एक आळशी मुलगी होते असं कृष्णाने सांगितलं. या जाहिरातीत ती म्हणतेय, “मी मोठी होईपर्यंत कायम एका असुरक्षिततेचा सामना केला आणि तो म्हणजे सतत माझ्या भावाशी माझी तुलना करणं. सुरुवातीपासूनच तो प्रत्येक गोष्टीत उत्तम आणि चपळ होता. तर दुसरीकडे मी एक जास्त वजन असलेली, आळशी आणि सगळ्यांच्या विरोधात जाणं पसंत करणारी मुलगी होते.” असं कृष्णा या जाहिरातीत सांगतेय.
पुढे ती म्हणालीय, “जे लोक मला तेव्हा ओळखतही नव्हते अशा लोकांकडून तेव्हा मला ऐकावं लागत होतं. मला माझा मार्ग शोधण्यासाठी थोडा वेळ गेला. समाजातील त्या सर्व आवाजांचा उपयोग मी माझं स्थान निर्माण करण्यासाठी आणि माझं व्यक्तीमत्व घडवण्यासाठी इंधन म्हणून केला. आता माझी स्पर्धा फक्त स्वत:शी आहे. मी काल जे होते त्याहून उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत आहे.” असं कृष्णा म्हणाली.प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या असुरक्षितते जगत असतो. मात्र त्यावर मात करणं गरजेचं असल्याचं कृष्णा या जाहिरातीत म्हणाली.
कृष्णाच्या या व्हिडीओवर दिशा पटानीने कमेंट केलीय. “वा क्या बात है” असं दिशा म्हणालीय. तर कृष्णाची आई आयशा श्रॉफ यांनी देखील कमेंट करत कृष्णाचं कौतुक केलंय. हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णाने टायगरसोबत केल्या जाणाऱ्या तुलनेचा खुलासा केला होता. “टायगरसोबत सतत तुलना केली जात असली तरी याकडे मी सकारात्मकदृष्टीने पाहिलं. सतत प्रेरणा देणारा टायगरसारखा भाऊ असणं मोठी गोष्ट आहे ” असं ती म्हणाली होती.