बंगाली अभिनेत्री पायल सरकारने तिला सोशल मीडियावर अश्लील मेसेज येत असल्यामुळे कोलकत्ता सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार केली आहे. हे मेसेज एका दिग्दर्शकाच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फेक अकाऊंटवरुन केले जात होते. शनिवारी पायलने या फेसबुक प्रोफाइलची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली होती. त्यानंतर तिला अश्लील मेसेज येण्यास सुरुवात झाली.
स्वत: पायलने याबाबत माहिती दिली आहे. तिने सांगितले की एक अतिशय लोकप्रिय दिग्दर्शकाच्या नावाने फेसबुकवर फेक प्रोफाइल तयार करण्यात आले आहे. या प्रोफाइलमध्ये त्या दिग्दर्शकाच्या कामाविषयी माहिती देण्यात आली आहे आणि काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर मेसेजच्या माध्यमातून मला एका चित्रपटासाठी ऑफर देण्यात आली अन् त्यानंतर मला अश्लील मेसेज येऊ लागले. तिने या मेसेजचे काही स्क्रीनशॉट फेसबुकवर शेअर केले आहेत.
सतत अश्लील मेसेज येऊ लागल्यामुळे पायलने कोलकत्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हे फेक अकाऊंट पोलिसांनी बंद केले आहे. आता हे फेसबुक अकाऊंट कुठून ऑपरेट केले जात होते याचा शोध पोलीस घेत आहेत.