मुंबई : बहुचर्चित 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वाला अखेर मुहूर्त मिळणार आहे. दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीच इन्स्टाग्रामवरुन 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनची घोषणा केली आहे. बिग बॉसच्या आगमनाची चाहूल लागल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच 'बिग बॉस मराठी 3'चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये एका कुटुंबाची धमाल पाहायला मिळते आहे.
या नव्या प्रोमोमध्ये एक कुटुंब आपल्या देवाघरी गेलेल्या आईला आपलं घराचं स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगतात. यानंतर ते घरात नवा टीव्ही आणल्याचे देखील तिला सांगतात. इतक्यात फोटोंत हालचाली होतात आणि त्यातील आई लेकाच्या जोरदार श्रीमुखात भडकावते. यानंतर ती त्यांना म्हणते की, टीव्ही आणलाय तर, माझ्यासमोर ठेवा ना, मी कसा बघणार? यानंतर टीव्ही तिच्या फोटोसमोर येतो आणि 'आता घराघरांत एकच डिमांड, ऐकू येऊ दे बिग बॉसची कमांड!', असं म्हणत बिग बॉसचा प्रोमो सुरु होतो.
दोन वर्षांनंतर नवा सिझन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट-मालिका यांची शूटिंग गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून चार महिने बंद होती. जुलै महिन्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर गाडी हळूहळू रुळावर आली. मात्र चित्रीकरण करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गेल्या वर्षी 'बिग बॉस मराठी'चा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाच नाही. एकीकडे सलमान खानचा हिंदी बिग बॉस (Bigg Boss 14) सर्व नियम पाळून पार पडला. त्यामुळे प्रेक्षकांना मराठी पर्वाचीही उत्सुकता लागली होती. मात्र ही उत्सुकता दोन वर्षांच्या कालावधीनंतर शमणार आहे.
बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक रात्रंदिवस एकत्र राहतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन कसे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. बिग बॉसच्या घरातील टास्कमध्येही कोरोनाशी निगडीत क्रिएटिव्ह खेळ पाहायला मिळू शकतात.
मांजरेकरांकडेच पुन्हा सूत्रसंचालन
दिग्गज अभिनेते-निर्माते महेश मांजरेकर 'बिग बॉस मराठी'चे सूत्रसंचालन करतात. मांजरेकरांच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे पुढील सिझनची सूत्रंही मांजरेकरांच्याच हाती सोपवली जाणार आहेत. दोन वर्षापासून 'बिग बॉस'चा मराठमोळा आवाज नव्याने ऐकण्यासाठी प्रेक्षकांने कान आसुसले आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले होते. आता या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याची उत्सुकता वाढली आहे.
कोणाकोणाला झाली विचारणा?
'बिग बॉस मराठी 3'च्या आलिशान घरात राहण्यासाठी काही कलाकारांना विचारणा झाल्याची माहिती समोर येत आहे. या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलका कुबल यांचा देखील समवेश आहे. अलका कुबल यांनी यंदाचा सीझनमध्ये या घरात प्रवेश करावा यासाठी त्यांना ही ऑफर देण्यात आली होती. तर. 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार हिला देखील 'बिग बॉस मराठी 3'साठी विचारणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, आगरी कोळी गीतांचे बादशाह अशी ज्यांची ओळख आहे, ते गायक संतोष चौधरी देखील या पर्वात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे.
याव्यतिरिक्त 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतील 'अपर्णा' अर्थात अभिनेत्री अंकिता निक्रड ही देखील यंदाच्या पर्वाचा भाग असणार असल्याचे कळते आहे. सध्या 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून 'अपर्णा'च्या पात्राला तात्पुरते बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे ही अभिनेत्री आता बिग बॉसच्या घरत दिसण्याची शक्यता वाढली आहे.
आणखी कोणाकोणाची नावं चर्चेत?
या कलाकारांव्यतिरिक्त 'देवमाणूस' मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री नेहा खानपासून 'अग्गंबाई सासूबाई'मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावंही चर्चेत आहेत. अक्षया देवधर, संग्राम समेळ, पल्लवी सुभाष, रसिका सुनील, केतकी चितळे, चिन्मय उदगीरकर, ऋषी सक्सेना, नेहा जोशी, अंशुमन विचारे, किशोरी आंबिये यासारख्या कलाकारांनाही या शोसाठी विचारणा झाल्याचं बोललं जातं आहे.