'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व सुरु झाल्यापासून प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला सातत्याने चर्चेत येत आहे. शिवलीलाने बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. तर, शिवलीला घरातही फारशी सक्रीय नसल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तिच्याविषयी कुरबूर सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शिवलीला चांगलीच चर्चेत येत आहे. त्यातच नाव मोठं लक्षण खोटं या टास्कमध्ये शिवलीलाने तिच्या जाहीर केलेल्या निर्धारामुळे अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत.
अलिकडेच बिग बॉसच्या घरात नाव मोठं लक्षण खोटं हा नॉमिनेशन टास्क पार पडला. यात घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातील ७ सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं. यात शिवलीलाचाही सहभाग होता. परंतु, यावेळी तिने मांडलेलं मत ऐकून अनेक जण थक्क झाले आहेत.
सुरुवातीच्या काळात मला गेम कळायला थोडा वेळ लागला वगैरे या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग असेल. बिग बॉसचं घर फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल,"असं शिवलीला म्हणाली.
दरम्यान, शिवलीलाच्या या वक्तव्यांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या टास्कमध्ये शिवलीला खरंच तिने सांगितल्याप्रमाणे सहभाग घेणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.