झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. मात्र या कार्यक्रमातील एका विनोदवीराने नुकतंच या कार्यक्रमाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.
‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘गुंठामंत्री’ अशी ओळख असलेला कृष्णा घोंगे हा गेल्या काही दिवसांपासून सेटवर किंवा एकाही भागात दिसत नाही. त्यामुळे कृष्णाने हा शो सोडल्याची चर्चा सिनेसृष्टीत रंगली होती. मात्र नुकतंच त्या सोशल मीडियावर पोस्ट करत यामागचे कारण सांगितले आहे. कृष्णाने नुकतंच इन्स्टाग्रामवर अभिनेता प्रतीक गांधीसोबत एक फोटो शेअर केला आहे. ‘रिस्क है तो इश्क है’, असे अनोखे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे. त्यामुळे आता कृष्णा हा झी च्या हिंदी मालिकेत झळकणार असल्याचे बोललं जात आहे.
कृष्णा हा हिंदी ‘झी कॉमेडी शो’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतीक गांधी हा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी कॉमेडी शोमध्ये आला होता, तेव्हा कृष्णाने त्याच्यासोबतचा एक फोटा शेअर केला आहे. दरम्यान कृष्णा आता हिंदी मालिकेत काम करणार असल्याने यापुढे तो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दिसणार नाही.
कोण आहे कृष्णा घोंगे?
कृष्णा हा मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक या गावचा आहे. चला हवा येऊ द्या मधील गुंठामंत्री म्हणून त्याने विशेष ओळख निर्माण केली होती. कृष्णा घोंगे हा सर्वसामान्य घरातील असून अत्यंत कमी काळातच सर्वांच्या आवडीचा कलाकार बनला. कृष्णाचे वडील भागूजी घोंगे हे शेतमजूर आहेत. त्यासोबतच ते छत्र्या दुरुस्त करणे, गवंडी काम करणे अशी छोटी मोठी कामे करायचे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती.
कृष्णा हा नोकरी करत असताना आवड म्हणून फिल्ममेकिंगचे धडे गिरवायला सुरुवात केली. पण गावातील रांगड्या भाषेमुळे त्याला अनेक ठिकाणी नकार मिळाला. मग त्याने स्वत:च शॉर्टफिल्म बनवायला सुरवात केली. यादरम्यान त्याला अनेक पारितोषिकही मिळाली. त्यानंतर एकेदिवशी निलेश साबळेशी त्याची ओळख झाली. पुढे निलेशचा असिस्टंट म्हणून त्याला काम मिळाले. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात छोट्या मोठ्या भूमिका साकारून कृष्णाने एक वेगळी ओळख निर्माण केली.