मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर चार आठवड्यानंतर सुटका होणार आहे. आर्यन खानसह अन्य दोन आरोपींचा जामीन मंजूर झाल्यामुळे आज (३० ऑक्टोबर) आर्यनची सुटका होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासात आर्यन हा तुरुंगाबाहेर पाहायला मिळणार आहे. आर्यनच्या सुटकेमुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केलं आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने आणि शाहरुखच्या सहकलाकाराने ‘तुम्ही तुमच्या मुलांना साभांळा,’ असा खोचक सल्ला दिला आहे.
आर्यनला जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे. आर्यन खानला अटक झाल्यापासून त्याला जामीन मिळेपर्यंत अनेकांनी खान कुटुंबाला समर्थन देणारे ट्वीट केले होते. आर्यनला जामीन मिळताच अनेक कलाकारांनी शाहरुख खानचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. मात्र बॉलिवूड अभिनेता पियूष मिश्रा याने शाहरुखला खोचक सल्ला दिला आहे. बॉलिवूड अभिनेत्यांनी त्यांच्या मुलांची सांभाळा, असे पियूष मिश्रा म्हणाला. पियूषने १९९८ मध्ये ‘दिल से’ या चित्रपटात शाहरुखसोबत स्क्रिन शेअर केली होती.
“आर्यनच्या जामीनावर माझी प्रतिक्रिया काय असेल? हे सर्व त्याने केलंय, त्याला जामीन मिळाला, तो बाहेर आला. आता शाहरुख खान, त्याचा मुलगा किंवा समीर वानखेडे बघतील. मला त्याच्याशी काहीही घेणदेणं नाही. ठीक आहे. जे काही झालंय ते झालंय. तुम्ही जे केलं ते तुम्हाला भोगावे लागेल. आता तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, एवढंच”, असे पियूष मिश्रा म्हणाला.
दरम्यान आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.
कोर्टाच्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. तसेच आर्यनला अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपींसारख्या मित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. आर्यनला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.
आर्यन खानचे मन्नतमध्ये अतिशय भव्य पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आर्यनच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी शाहरुख खान आणि गौरी यांनी सर्व तयारी केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खानने मन्नत निळ्या दिव्यांनी सजवला जात आहे.