करोना काळात अभिनेता सोनू सूद सध्या गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा मदतीसाठी धावून येत होता. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये त्याने मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत सोनू सूदने हजारो लोकांची मदत केली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आल्यानंतर अद्यापही तो अनेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहे. नुकतंच सोनू सूदने दोन लहान बाळांसह एका व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
सोनू सूदने सकाळी सलग तीन ट्वीटला रिट्वीट केले आहेत. यात काही गरजूंनी त्याच्याकडे मदत मागितली होती. यातील पहिल्या ट्वीटमध्ये एका २२ दिवसांच्या बाळासाठी वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयात एका २२ दिवसांच्या बाळाला हृदयासंबंधित गंभीर आजार आहे. याबाबत त्याची एक शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र यासाठी जवळपास २ लाख ५० हजारांची गरज आहे. त्याचे पालक फार गरीब असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. यामुळे वाडिया रुग्णालयाने एक पत्रक काढून आर्थिक मदत मागितली आहे.
यानंतर त्याच्या वडिलांनी ट्वीट करत सोनू सूदकडे मदत मागितली आहे. सर माझ्या मुलाला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला हृदयविकाराचा त्रास होत आहे. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. पण आम्ही आवश्यक पैशांची व्यवस्था करू शकत नाही. आम्हाला तुमच्या मदतीची अत्यंत गरज आहे. कृपया आम्हाला लवकरात लवकर मदत करा, असे ट्वीट त्याच्या वडिलांनी केले आहे. त्यांनी त्याच्यासोबत रुग्णालयाची काही कागदपत्रही जोडली आहेत.
दरम्यान त्याच्या वडिलांच्या ट्वीटनंतर सोनू सूदने तात्काळ त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काळजी करू नका, शस्त्रक्रियेचे नियोजन केले आहे, असे उत्तर त्याने दिले आहे. यापाठोपाठ वाडिया रुग्णालयातच उपचार घेत असलेल्या हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका महिन्याच्या मुलीलाही सोनू सूदने मदत केली आहे. यावर त्याने होऊन जाईल, असे उत्तर दिले आहे. तर एका व्यक्तीला तोंडाचा कर्करोग झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असून त्याच्या उपचारासाठी निधीची आवश्यकता आहे, असे ट्वीट त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीने केले आहे. त्यावर सोनू सूदने हे पूर्ण झालंय, अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
दरम्यान या तिन्हीही घटनानंतर नेटकऱ्यांकडून सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. खूप छान, मस्त, रिअल हिरो, अशा अनेक कमेंट नेटकरी सध्या त्याच्या या ट्वीटवर करत आहेत. तसेच काहीजण त्याच्या ट्वीटखाली कमेंट करत त्याच्याकडून मदत मागताना दिसत आहे.