नव्या उमेदीसह नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. २०२१च्या शेवटच्या रात्री सर्वांनीच जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यामुळे सर्वांची सकाळ नेहमीपेक्षा उशीरानं झाली असेल पण बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमारनं मात्र त्याचा रोजचा नियम अजिबात मोडला नाही. आपल्या रोजच्या नियमासोबतच त्यानं नव्या वर्षाचं स्वागत केलं. सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असलेल्या अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
अक्षय कुमारनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मालदीवची नयनरम्य सकाळ पाहायला मिळत आहे. एकीकडे सूर्योदय होत आहे तर दुसरीकडे अक्षय कुमार सूर्यासमोर हात जोडून गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहे. दरम्यान रोज अक्षयच्या दिवसाची सुरुवात अशीच होते. यात तो कधीच कोणताही बदल करत नाही. पण नववर्षाच्या सुरुवातीला अक्षयच्या व्हिडीओनं सर्वांची मनं जिंकली आहेत.
व्हिडीओ शेअर करताना अक्षय कुमारनं लिहिलं, ‘नवीन वर्ष, तोच मी. सकाळी उठलो आणि जुना मित्र सूर्याला नमस्कार केला आणि करोना व्यतिरिक्त सर्व सकारात्मक गोष्टींसोबत २०२२ची सुरुवात केली. सर्वांच्या चांगल्या आयुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!’
अक्षय कुमार सध्या त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगी नितारा यांच्यासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं ट्विंकलचा वाढदिवसही तिथेच साजरा केला होता. त्यानंतर आता नव्या वर्षाचं सेलिब्रेशनही तो मालदीवमध्येच करताना दिसत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटानंतर तो कुटुंबासोबत मालदीवला रवाना झाला होता. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘रक्षा बंधन’, ‘रामसेतू’, ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.