भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर गेल्या १६ दिवसांपासून उपचार सुरु आहेत. शनिवारी ८ जानेवारी रोजी त्यांना करोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशभरातून लोक प्रार्थना करत आहेत. नुकतंच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीविषयी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लतादीदींच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत आहे. मात्र तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरात लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा’, असे ते म्हणाले. प्रतित समदानी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान लता मंगेशकर यांना सध्यातरी कोणत्याही व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही. लता मंगेशकर यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या वॉर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लता मंगेशकर या काही इतर काही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र उपचारादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली.
याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.