नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा शुक्रवारच्या तुलनेत वीकेंडला किंचितसा वाढलेला पहायला मिळाला. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 6.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाईत थोडीशी वाढ पहायला मिळाली. मात्र तरीही ज्याप्रकारे या चित्रपटाचं प्रमोशन आणि माऊथ पब्लिसिटी झाली, त्याचा परिणाम कमाईवर फारसा झालेला दिसत नाही. दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या प्रत्येक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना मातीतल्या वास्तव गोष्टी अनुभवायला मिळाल्या आहेत. आता हिंदीत पहिल्यांदाच त्यांनी ‘झुंड‘च्या निमित्ताने रुढ चौकट मोडून काढण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याची पोचपावती अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे दिली. असं असलं तरी या माऊथ पब्लिसिटीचा परिणाम मात्र बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर होताना दिसत नाहीये. (Jhund Box Office Collection)
‘झुंड’ची पहिल्या वीकेंडची कमाईशुक्रवार- 1.50 कोटी रुपयेशनिवार- 2.10 कोटी रुपयेरविवार- 2.90 कोटी रुपयेएकूण- 6.50 कोटी रुपये
नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.
बॉक्स ऑफिसवर झुंडला सध्या ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांची टक्कर आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ची 100 कोटींकडे वाटचाल होत आहे. तर दुसरीकडे ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचे शोज अजूनही हाऊसफुल आहेत. त्यामुळे या स्पर्धेत ‘झुंड’ला आपला वेग वाढवावा लागणार, हे निश्चित! पुढील आठवड्यात म्हणजेच 11 मार्च रोजी प्रभासचा ‘राधेश्याम’ आणि अनुपम खेर यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ‘झुंड’समोरील स्पर्धा आणखी वाढणार आहे.