दुकानांच्या बंद दारावर संपर्क क्रमांक लिहून व्यवसायाला गती
मुंबई : कठोर र्निबधांमुळे ठप्प झालेला व्यवसाय सावरण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानदारांनी ‘संपर्कसूत्र’ शोधले आहे. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक बंद दुकानाच्या दारावर लिहून वस्तू उपलब्ध होतील, असा संदेश ग्राहकांसाठी लिहून ठेवण्याची शक्कल व्यावसायिकांनी लढवली असून र्निबधांच्या नियमांतूनही पळवाट शोधली आहे. प्रत्यक्षात दुकान बंद दिसले तरी दुकानाबाहेर उभे राहून कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना दुकानाबाहेर वस्तू आणून दिली जाते तर कधी तरी मागच्या दाराने दुकानात प्रवेशही दिला जातो.
जवळपास गेले दोन महिने कठोर र्निबधांमुळे दुकाने बंद ठेवण्यात आली असली तरी दुकानांचे भाडे, कामगारांचा पगार, वीज देयक यातून व्यावसायिकांची सुटका झालेली नाही. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी संपर्क क्रमांकाची युक्ती लढवली आहे. दुकान बंद ठेवून एक किंवा दोन कर्मचारी दुकानाबाहेर किंवा आसपासच्या परिसरात उभे केले जातात. बाजारपेठ बंद असली तरी बरेच ग्राहक दुकाने खुली असतील या आशेने येतात किं वा अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांच्या नजरेस संपर्क क्र मांक पडतात. त्यामुळे आलेले ग्राहक बंद दुकानावर लिहिलेल्या क्रमांकावर संपर्क साधतात आणि दुकानाबाहेर असलेले कर्मचारी त्यांच्याकडून खरेदीचे तपशील मिळवतात. याच वेळी एक कर्मचारी दुकानाच्या मागच्या दारात उभा असतो. ग्राहकांनी सांगितलेल्या वस्तू त्यांना दुकानाबाहेर आणून दिल्या जातात. जेथे ग्राहकांच्या पसंतीचा, निवडीचा प्रश्न असतो अशा वेळी ग्राहकांना दुकानात नेऊन खरेदी करू दिली जाते, बाहेर येतानाही पोलिसांचा पहारा नाही याची दखल घेऊन ग्राहकांना बाहेर काढले जाते. अशा पद्धतीने बहुतांशी दुकानात खरेदी-विक्री सुरू आहे. अगदी साडी, कपडे, भांडी, उपकरणे सगळ्याच व्यावसायिकांनी या सूत्राचा वापर केला आहे.
लाखोंच्या नुकसानीवर मलमपट्टी
‘व्यावसायिकांनी आपली दुरवस्था मांडूनही आम्हाला कोणतीही मुभा देण्यात आली नाही. आज दादरसारख्या परिसरात व्यवसाय करताना लाखोंचे भाडे कसे भरायचे ही टांगती तलवार कायम आमच्या डोक्यावर असते. शिवाय वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोटही आमच्याच व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांचीही काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे लोकांकडून मागणी होत आहे, लोकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे केवळ दुकान बंद असल्याने हातचे ग्राहक जाऊ नये आणि होणाऱ्या नुकसानीतून काहीसा दिलासा मिळावा या उद्देशाने हे करावे लागत आहे. आता ठरावीक वेळेपुरते दुकान सुरू ठेवता येणार आहे. मात्र वेळेचे निर्बंध असल्यास एकाच वेळी ग्राहक येतात आणि गर्दी अधिक होते. त्या वेळीही दुकानावर संपर्क क्र मांक लिहून गरजू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादर येथील एका साडी दुकानदाराने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.