मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. चिनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी महापालिका 79 हजार खर्च करणार आहे. त्यापैकी 300 कॉन्सन्ट्रेटर महापालिकेने उत्पादकाकडून न घेता पुरवठादाराकडून घेतले आहे. यामुळे पालिकेचं 1 कोटी 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करुन महापालिकेने प्रति मिनिट दहा लिटर क्षमतेचे 1200 कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदीसाठी श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पालिका यासाठी कंत्राटदाराला 10 कोटी 42 लाख रुपये मोजणार आहे. वितरकाने पहिल्या टप्प्यात 300 कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा महापालिकेला केला आहे. जे कॉन्सन्ट्रेटर बाजारात 54 हजार रुपयांना मिळतात तेच कॉन्सन्ट्रेटर पालिकेने 79 हजार रुपयांना विकत घेतले आहे. या व्यवहारात पालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं रवी राजा म्हणाले.
"महापालिकेने उत्पादन करणाऱ्या कंपन्यासोबत करार केला असता तर कमी किमतीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले असते. तसंच पालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपये वाचले असते," रवी राजा यांनी सांगितलं.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी कमी दरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळत असल्याचं म्हटलं आहे. "त्यांचे म्हणणे योग्य असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली होती. नागरिकांना आणि रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यात आली," अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णालयं आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी तब्बल 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी 79 हजार रुपये खर्च केला जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल 15 ते 20 हजार रुपये अधिक दराने ही खरेदी केली जात आहे. 1200 पैकी 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठादाराने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.