क्रुझ अमलीपदार्थ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी (एनसीबी) समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपांचा मुद्दा आता थेट न्यायालयामध्ये चर्चेत आलाय. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान हा मुद्दा एनसीबीकडून उपस्थित करण्यात आला. तसेच या मुद्द्याच्या आधारने एनसीबीने तपासामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगत साईलच्या प्रतिज्ञापत्रामध्ये शाहरुखच्या मॅनेजरचं नाव असल्याचं न्यायलायच्या निदर्शनास आणून दिलं.
शाहरुखची मॅनेजर येणार अडचणी?प्राभकर साईलने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन तपासामध्ये अडथळा आणला जात असल्याचं स्पष्ट होतं आहे, असं एनसीबीने आपली बाजू मांडताना म्हटलं आहे. शनिवारी साईलने प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये दाखल केलं आहे. “या प्रतिज्ञापत्रामध्ये पुजा दादलानींचं नाव आहे. त्या अर्जदाराशीसंबंधित (आर्यन खानशी) मॅनेजर आहेत. या महिलेने या साक्षीदाराला प्रभावित सध्या सुरु असणाऱ्या तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. अशाप्रकारे तपासामध्ये अडथळा आणल्यास या प्रकरणामधील सत्य समोर येण्यामध्ये अडचणी निर्माण होतील,” असं एनसीबीने आपल्या युक्तीवादादरम्यान म्हटलं आहे. लेखी स्वरुपामध्ये एनसीबीने आपलं म्हणणं न्यायालयासमोर मांडलं आहे. त्यामुळे आता शाहरुखची मॅनेजर असणारी पुजा दादलानीही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयामध्ये आज या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
त्या आरोपांशी संबंध नाही…दरम्यान, प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या खंडणीच्या आरोपाशी आपला काहीही संबंध नाही. शिवाय आपण एनसीबी वा एनसीबीच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर आरोप केलेले नाहीत, असा दावा याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनच्यावतीने मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.
या सगळ्याचे खापर आर्यनच्या माथीआतापर्यंत राजकीय नेत्याच्या जावयाला अटक केल्याचा सूड म्हणून तपासावर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. साईल प्रकरणानंतर मात्र या सगळ्याचे खापर आर्यनच्या माथी फोडण्यात येत असल्याचा आरोपही आर्यनच्यावतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहटगी यांनी केला.
आर्यनकडे अमलीपदार्थ मिळाले नाहीतआर्यनकडे अमलीपदार्थ मिळालेले नाहीत. तसेच अमलीपदार्थाचे सेवन केले की नाही याची शहानिशा करणारी त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचेही रोहटगी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
प्रभाकर साईलचा जबाब नोंदवणारअमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एसीबी) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल आरोप करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा एनसीबी जबाब नोंदवणार आहे. हा जबाब गुरुवारी नोंदण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पथकाकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा आज जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी रुपये अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईलने केला होता.
आर्यन-अनन्यामधील कथित संभाषणआर्यन खान व अनन्या पांडे यांचे कथित संभाषण उघड झाले असून त्यात ते अमलीपदार्थांबद्दल संभाषण करत असल्याचे दिसून येत आहे. या कथित चॅटमध्ये अमलीपदार्थांसह एनसीबीचाही उल्लेख केला आहे. त्यात कोकेन व वीड(गांजा) सारख्या शब्दांचा उल्लेख आहे. याबाबत एनसीबीला विचारले असता त्यांच्याकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.