मुंबई: अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे(एनसीबी) पंच प्रभाकर साईल यांच्या आरोपांनंतर तपासाला सुरुवात करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या चौकशी पथकाचा तपास आता आर्थिक व्यवहारांच्या आरोपांवर केंद्रित झाला आहे. त्याबाबत पुरावे गोळा करण्यासाठी मुंबई पोलिसांचे चौकशी पथक शाहरुखची व्यवस्थापक पूजा ददलानीचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ददलानी हिचे लोअर परळमध्ये गोसावीला भेट घेतल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण मुंबई पोलिसांच्या चौकशी पथकाच्या हाती लागले होते.? याबाबत अधिक माहिती घेण्याच्या अनुषंगाने पथक ददलानी यांचा जबाब नोंदवणार आहे. जबाब सोमवारी नोंदवण्याची शक्यता आहे.
आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांच्या तक्रारीसह एकूण चार तक्रारींप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक तपास करत आहे.
शाहरुखच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची मागणी..
मुंबई पोलिसांच्या चौकशी पथकाने शनिवारी याप्रकरणी सॅम डिसोझाचा मित्र मयूर व एक हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवला होता. पूजा ददलानीला संपर्क करण्यापूर्वी आरोपी गोसावीने शाहरुखचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या वेळी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडून गोसावीला एका अभिनेत्याच्या भावाकडून पुढे पूजा ददलानीचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळाला होता. तिच्याशी संपर्क साधून पुढे पूजाला आर्यनच्या आवाजाची ध्वनिफीत पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.