श्री सुनीत शर्मा, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड आणि भारत सरकारचे पदसिद्ध प्रधान सचिव यांनी दि. ८.११.२०२१ रोजी मध्य रेल्वेच्या भेटीदरम्यान मध्य रेल्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानक विकासाच्या कामगिरीचा आढावा घेतला. श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि इतर विभागांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
तत्पूर्वी, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विकास प्रदर्शनाची पाहणी केली जेथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या विकासाची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विकासाचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत: निर्गमन आणि आगमन, प्रवासी धारण क्षेत्र; उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी दोन स्वतंत्र नोड; सर्व वातावरणाला योग्य छप्पर, अखंड संपर्कासाठी आणि चालण्यायोग्यता इत्यादींसाठी वेगवेगळे प्रवेश.
श्री शर्मा यांनी मध्य रेल्वेच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि एप्रिल-ऑक्टोबर २०२१ या कालावधीत मध्य रेल्वेने साध्य केलेल्या ४१.०२ दशलक्ष टन मालवाहतुकीचे, एप्रिल-ऑक्टोबर १७४.४० कोटी रुपयांच्या पार्सल महसुलात अव्वल स्थान राखून व्यवसाय विकास युनिट्सच्या कामगिरीचे कौतुक केले. व्यावसायिक, व्यापारी आणि डीलर्सना त्यांच्या मालाची त्वरीत वाहतूक करण्यासाठी सुलभ प्रवेश प्रदान करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. त्यांनी किसान रेल यशस्वीपणे चालवल्याबद्दल कौतुक केले. किसान रेल मुळे परिसरातील शेतकर्यांना मोठा फायदा झाला आणि त्यांच्या नाशवंत उत्पादनासाठी मोठ्या बाजारपेठांसह चांगले उत्पन्न मिळाले. किसान रेल हे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी विकास आणि समृद्धीचे इंजिन बनले आहे, असे त्यांनी नमूद केले.
श्री सुनीत शर्मा यांनी संरक्षा हे मिशन क्षेत्र असायला हवे याचा पुनरुच्चार केला आणि अधिका-यांना अधिक क्षेत्र तपासणी करण्याचे आवाहन केले. मध्य रेल्वेवरील विद्युतीकरण, दुहेरीकरण, स्थानक विकास आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी उत्तम मालवाहतूक कामगिरीबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.
नंतर श्री रवी अग्रवाल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल विकास निगम यांनी देखील मुंबई रेल विकास निगमच्या प्रकल्पांवर सादरीकरण केले.