मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू असाना अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगताना दिसत आहे. राज्यातील सत्ताधारी विरूद्ध केंद्र असा वाद सध्या पाहायला मिळत असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही ड्रग्ज प्रकरणावरून मौन सोडलं आहे.
भाजप नेते नारायण राणेंनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नारायण राणेंनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन निवासस्थानी जात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत.
खरंतर ड्रग्ज या राज्यात यायलाच नको. या ड्रग्जमुळे भावी पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. ड्रग्जवर कडक कारवाई करणं आणि ड्रग्जशी संबंधित लोकांना अटक करणं ही सरकारची जबाबदारी आहे पण सरकार ते करत नाही, असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.
राज्यात आरोप प्रत्यारोप चाललेत पण ड्रग्ज बंद करण्यासाठी कणखर मोहिम सुरू करू असं मुख्यमंत्री का बोलत नाहीत?. मुख्यमंत्र्यांनी कणखरपणे बोललं पाहिजे आणि पोलिसांना कारवाई करायला लावली पाहिजे. पोलिसांना कलेक्शनला वापरता पण ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?, असा घणाघाती सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.