एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यानंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. आज पत्रकार परिषद घेत मलिकांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्या अधिकाऱ्याचे जुने संबंध असल्याने ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले? मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही.” असे अनेक सवाल मलिकांनी उपस्थित केले आहेत. तर, या आरोपानंतर ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मलिकांना प्रत्युत्तर दिलंय.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये एक सुविचार शेअर केलाय. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा हा सुविचार आहे. “आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं, असा आशय त्या सुविचारात आहे.
अमृता फडणवीसांची कवितेच्या माध्यमातून मलिकांवर टीका..
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे पुन्हा एकदा राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नवाब मलिकांना काळा पैसा वाचवायचा आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. “बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतली. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,” असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.