ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. एसटी कामगारांना शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी करत काल मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेत्यांसह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं. जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर कर्मचारी मुंबई सोडणार नसल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे कामावर रूजू न होणाऱ्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ आक्रमक झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवलीये परवा 376 आणि काल 542 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. कामावर हजर राहावे असे आवाहन संघटनांनी करावे. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे. तर महामंडळाच्या विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचे आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलं. त्यामुळे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आज एस.टी.कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. मनसेनं यापूर्वीच एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहेत. एसटीच्या विभागातल्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या कामगार न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातल्या कामगार न्यायालयात आज रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो. आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.