गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यामध्ये सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये म्हणून सर्वच स्तरांवरुन प्रयत्न सुरु असताना आज एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या राज यांच्या निवसास्थानी ही बैठक पार पडली. या भेटीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत काय चर्चा झाली याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
“एसटी कर्मचारी संघटनेची लोक राज ठाकरेंना भेटली. २८ संघटनांना बाजूला ठेवून एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत असं त्यांनी राज यांना चर्चेदरम्यान सांगितलं. त्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी एसटी महामंडळचे विलीनीकरण करावे अशी आहे,” असं नांदगावकर म्हणाले.
तसेच पुढे बोलताना नांदगावकर यांनी, “सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला जातो तोच एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करावा. ते जर दिलं तर ते महत्त्वाचे पाऊल ठरेल,” असंही प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. “आम्ही असं ठरवलं आहे मनसे सरकाराशी यावर लवकरच बोलणार आहे, स्वतः राज ठाकरे या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालतील, त्यानंतर सरकारशी बोलणं झालं की मग कर्मचाऱ्यांशी बोलेन असं राज म्हणाले आहेत,” असंही नांदगावकर यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कृपया आत्महत्या करू नका अशी विनंती केली असल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं. राज ठाकरे कर्मचाऱ्यांसोबत आहे अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिल्याचं नांदगावकरांनी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणासंदर्भाती सरकारमध्ये कोणाशी चर्चा करणार असा प्रश्न नांदगावकर यांनी विचारण्यात आला असता त्यांनी, “राज यांना कोणाशी बोलावं लागेल हे माहीत आहे,” असं उत्तर दिलं.