मुंबई : मुंबईच्या लोकलवर बॉम्ब हल्ला करण्यात येणार असल्याचा निनावी फोनने खळबळ उडाली आहे. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन सुरु असून सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना कोणतीही संशयित वस्तू याठिकाणी आढळून आली नाही. मुंबई लोकलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
निनावी फोननंतर लोकल स्थानकावर देखील जीआरपी आणि मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आली होती. स्थानकांवर येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी बांद्रा जीआरपी पोलिसांना आज संध्याकाळी 6:25 दरम्यान फोन वरून निनावी फोन आला होता. ज्याच्यानंतर मुंबई पोलिस, जीआरपी, डॉग स्कॉड आणि बॉम्ब स्कॉडकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं असून ते सुरू आहे.
शनिवारी संध्याकाळी 6 : 25 दरम्यान रेल्वे विभागाला निनावी फोन आला होता. या फोनवरुन एका व्यक्तीनं पोलिसांना मुंबई लोकल बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. जावेद नावाचा इसम मुंबई मध्ये बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याची माहिती बांद्रा जीआरपी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच जी आर पी ने सर्व सुरक्षा यंत्रणांना दिली माहिती. मुंबई लोकलची सुरक्षा वाढवण्यात आली असून सर्व यंत्रणा हायअलर्टवर आहे. मात्र हा कॉल कुठून आला याची चौकशी मुंबई पोलीस करत आहे .
काही दिवसांपूर्वी मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची धमकी
मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती आता समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पश्चिम उपनगरातील बंगल्यावर बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या दोन मद्यधुंद इसमांनी खोटे कॉल करुन मुंबई पोलिसांनी झोप उडवली होती. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी या दोघांची नावं होती. सर्वात आश्चर्याची बाब अशी कि, या दोघांनी असा दावा केला की मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता.