मुंबई : गेल्या तीन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. वेतनवाढ करून आणि वेतन वेळेवर देण्याची ग्वाही देऊन तोडगा काढण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत याबाबत निर्णयाची शक्यता आहे.
शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती शरद पवार यांनी घेतली, असे परिवहनमंत्री परब यांनी सांगितले. कामगारांच्या मागण्यांवर कोणते पर्याय असू शकतात आणि त्यांचे समाधान कसे करता येईल, न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या समितीसमोर राज्य सरकारने कशा रीतीने बाजू मांडावी, यावरही चर्चा झाली. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांवरही विचार करण्यात आला, अशी माहितीही परब यांनी दिली.
संपावर तोडगा काढण्याचा प्रस्ताव आहे. तसेच कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची हमी दिली जावी, म्हणजे ते संप मागे घेण्याबाबत विचार करतील, यावर चर्चा करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी आणि वेतनवाढ करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. गेल्या १० ते १२ वर्षांत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल. येत्या गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संप आणि आर्थिक मदतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
आधीच अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाचे करोनाकाळात आणखी नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आणि वेतन वेळेवर होण्यात अडचण येऊ लागली. शिवाय गेल्या १० ते १२ वर्षांत जे नवीन कर्मचारी रुजू झाले त्यांचेवेतन खूप कमी आहे. ते वाढवण्याची गरज असल्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. वेळेवर वेतन आणि वेतनवाढ या दोन प्रमुख समस्या आहेत. वेतनवाढ करण्यासाठी आणि वेळेवर वेतन देण्यासाठी राज्य सरकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. विलिनीकरणाचा आग्रह एसटी कर्मचाऱ्यांनी सोडल्यास वेळेवर वेतन देण्यासाठी आणि वेतनवाढीसाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी यावर बैठकीत सहमती झाली. लवकरात लवकर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून हा संप मिटवावा, अशी सूचना शरद पवार यांनी केली.
वाहकांचे वेतन खूप कमी
एसटीच्या वाहकांचे वेतन फारच कमी असल्याची तक्रार आहे. यावर चालक-वाहकांच्या वेतनात वाढ करावी, असा प्रस्ताव आहे. वेतनात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचा रोष कमी होईल, असे सत्ताधारी पक्षांचे म्हणणे आहे.
विलीनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयासमोर आहे. त्याबाबत नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार न्यायालय जो निर्णय देईल, तो स्वीकारला जाईल. सरकार संपावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक आहे.
– अनिल परब, परिवहनमंत्री