राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय यंत्रणा लोकांना माझ्याविरोधात खोट्या तक्रारी करायला लावत आहेत. ते अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबतही करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच याबाबत माझ्याकडे पुरावे देखील असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नवाब मलिक म्हणाले, “दोन महिने झाले, आर्यन खान प्रकरणात आम्ही चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर पाळत ठेवली जात आहे. याबाबत एकाचा पाठलाग आमच्या हितचिंतकांनी केला. त्यावेळी ते पळाले. या संशयितांची माहिती ट्विटरवर अनेकांनी दिलीय. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं असता ते भाजपाशी संबंधित असल्याचं दिसत आहे.”
“अनिल देशमुख यांचहाबरोबर जसा खेळ झाला तसंच सुरू झालं आहे. याबाबत माझ्याकडे महिती आली आहे. याबाबत माहिती पोलिसांना देण्यात येईल,” असंही ते म्हणाले.
“जर केंद्रीय यंत्रणेचा वापर करत मंत्र्यांवर असे डाव खेळले जात असतील, घाबरवलं जात असेल तर हे सहन करणार नाही. माझ्याकडे केंद्रीय अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. याबाबत मी अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे,” असंही मलिकांनी नमूद केलं.
नवाब मलिक म्हणाले, “काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची, कार्यालयाची आणि माझे लहान नातू कोणत्या शाळेत जातात याची माहिती काढत असल्याचं मला कळालं. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन जण कॅमेरा घेऊन माझ्या घराचे फोटो काढत होते. तेव्हा घराच्या परिसरातील लोकांनीच त्यांना अडवलं. त्यानंतर ते पळू लागले. त्यांना टिळक टर्मिनस येथे पकडण्यात आलं.”
“मी ट्विटरवर या लोकांचे फोटो टाकले त्यानंतर या २ पैकी एकाची माहिती समोर आली आहे. ही एक व्यक्ती मागील २ महिन्यापासून राज्यात जे सुरू होतं त्यावरून माझ्या विरोधात ट्वीट करत होता. त्याचं नावही समोर आलंय. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. मी जेव्हा कुठं कागदपत्रे काढायला जातो किंवा कोणत्याही विभागात तक्रार करायला जातो तेथे ठिकठिकाणी यातील एक व्यक्ती दिसून आला आहे. त्यांना नेमकं काय करायचं आहे?”
दरम्यान, नवाब मलिक म्हणाले होते, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.”