दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोनाच्या ‘बी.१.१५२९’ या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्यांवर विशेष भर देण्याचे आदेश राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सर्व राज्यांना दिले आहेत. नव्या विषाणूमुळे भीतीचे कारण नाही, परंतु सतर्कता आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
नव्या विषाणूचे आत्तापर्यंत ७७ रुग्ण आढळले असून यातील बहुतांश रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये, तर चार बोटस्वाना आणि दोन हाँगकाँगमध्ये आढळले आहेत. डेल्टा किंवा आत्तापर्यंत आढळलेल्या करोना विषाणूच्या काटेरी प्रथिनामध्ये दोन ते तीन प्रकारचे उत्परिर्वतन झाले होते. परंतु या नव्या रूपामध्ये ३२ प्रकारचे उत्परिवर्तन झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे हा विषाणू आत्तापर्यंतच्या विषाणूच्या तुलनेत वेगाने पसरणारा असून तीव्रतेने रोगप्रतिकारक शक्तीवर आक्रमण करणारा असल्याचे आढळले आहे.
सध्या जगभरात फैलावलेल्या डेल्टापेक्षाही तो घातक ठरू शकतो, त्यामुळे जगभरातील वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या तरी तीन देशांमध्येच हा विषाणू आढळला असून घाबरण्याचे कारण नाही. परंतु सर्तकता बाळगणे गरजेचे आहे, असे मत करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
युरोपमध्ये सध्या वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. परंतु लसीकरण न झालेल्या भागांमध्येच हा परिणाम दिसत आहे. मागील दीड वर्षाचा अनुभव लक्षात घेता या काळात युरोपमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सध्या लगेचच आपल्याकडे करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्या तातडीने निर्बंध लागू करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपल्याकडे या नव्या विषाणूचा प्रवेश होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपल्याकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या राज्यांना सूचना
विषाणूचे उत्परिवर्तित रूप आढळल्यानंतर परदेशातून विशेषत: दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना आणि हाँगकाँगमधील प्रवाशांच्या करोना चाचण्या आणि तपासण्या बारकाईने करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. तसेच वेळोवेळी केल्या जाणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचण्यांवरही बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सोबरोबरच याआधी झालेल्या जिनोम सिक्र्वेंन्सग चाचण्यांमध्ये मिळतेजुळते विषाणूचे रुप आढळले आहे का याचीही फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेची यासंबंधी बैठक सुरू आहे. संघटनेने सांगितलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणीही केली जाईल. त्यामुळे सर्व बाबींवर आपण देखरेख ठेवत आहोत, असे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजित सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मुखपट्टीचा योग्य वापर आवश्यक
करोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि नव्या उत्परिवर्तित विषाणूचा उद्रेक होऊ नये यासाठी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा विषाणू आला तरी मुखपट्टीचा योग्य वापर केल्यास निश्चितच संरक्षण मिळते, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
… अन्यथा तिसरी लाट सौम्यच
नव्या विषाणूचा उद्रेक झाला नाही, तर संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता सौम्यच असणार आहे. परंतु या दृष्टीने रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणे, चाचण्या आणि लसीकरण वाढविणे सध्या गरजेचे आहे, असे मत डॉ. सुपे यांनी व्यक्त केले.
विलगीकरण, चाचण्यांवर भर
मुंबई विमानतळावर तीन देशांमधून आलेल्या प्रवाशांच्या चाचण्यांवर विशेष लक्ष दिले जावे. तसेच या प्रवाशांना विलगीकरणात ठेवणे बंधनकारक करावे. जेणेकरून बाधित असल्यास वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. याशिवाय लसीकरण वेगाने पूर्ण करावे आणि करोना प्रतिबंधात्मक उपाय विशेषत: मुखपट्टीच्या वापरावर भर देणे गरजेचे आहे. या सर्व सूचना कृती दलाच्यावतीने राज्य सरकारला लवकरच केल्या जातील, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.