पुण्यातील रहिवासी युवराज भोसले (४१) विरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्यासह तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवराज भोसलेला मुंबई सायबर पोलिसांनी मुंबईतील एका ३१ वर्षीय महिलेची मॅट्रिमोनिअल साइटद्वारे ३० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबईच्या सायबर पोलिस अधिकाऱ्यांनी भोसलेचे फोन कॉल डिटेल्स स्कॅन केले आणि पीडितांशी संपर्क साधून फसवणूक केल्याच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. डझनभर महिलांची फसवणूक करण्याच्या त्यांच्या पद्धतीबद्दल माहिती दिल्यानंतर तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, त्याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक पीडितांना धक्का बसला होता आणि ज्या व्यक्तीशी त्या बोलत होत्या आणि ज्याच्याशी लग्न करू इच्छित होत्या तो फसवणूक करणारा आहे यावर त्या विश्वास ठेवायला तयार नव्हत्या.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत भोसले यांच्याविरुद्ध कळवा पोलिस स्टेशन (ठाणे), खडकपाडा पोलिस स्टेशन (कल्याण) आणि विरार पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळवा पोलिस ठाण्यात बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार ही ठाण्यातील घटस्फोटित असून, भोसलेने तिला ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
कल्याणच्या प्रकरणात भोसलेने मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून पीडितेला फसवले. एका सायबर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तो महिलांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती शिवाजी (भोसले) महाराजांचे आठवे वंशज असल्याचे दाखवत असे. त्याने स्वत:ला खूप श्रीमंत असल्याचे दाखवून त्यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास जिंकला. लग्नाची तारीख जवळ आली की, त्याच्या घरावर आयकर विभागाच्या छाप्यांचे किस्से सांगायचा. ज्यामध्ये आयटी अधिकाऱ्यांनी त्याच्या घरातून आठ कोटी रुपये जप्त केल्याचे तो सांगत होता. नंतर तो वेगवेगळ्या खोट्या सबबी सांगून पीडितांकडून पैसे घेत असे.
“पीडितांशी बोलत असताना, आम्हाला आढळले की आयकर छापे आणि आठ कोटी रुपये जप्त करण्याची खोटी कहाणी अनेक प्रकरणांमध्ये सारखीच आहे,” पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
विरार पोलिसांच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर मॉडेलिंग फर्मद्वारे महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भोसले मुलींना मॉडेलिंगमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तसेच त्यांना फूस लावून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो काही साड्यांच्या ब्रँडचे मॉडेलिंग शूटदेखील करायचा. पोलिसांनी सांगितले की, तीन तक्रारींमध्ये एकत्रितपणे सुमारे एक कोटी रुपयांचा समावेश आहे. भोसलेचा साथीदार आर रेड्डी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. भोसले फसवणुकीचे सर्व पैसे रेड्डीच्या बँक खात्यातून मिळवायचा. रेड्डीला यासाठी कमिशन देण्यात आले होते.
सेंट्रल झोन सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोविलकर म्हणाले, “बुधवारी आम्ही भोसले आणि रेड्डी यांना कोर्टात हजर केले आणि पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने त्यांना १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.” भोसले यांच्या विरोधात आणखी एफआयआर दाखल होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दादरमधील एका महिलेला वैयक्तिक छायाचित्रे वापरून ब्लॅकमेल करून तिच्याकडून ३० लाख रुपये उकळल्याप्रकरणी भोसलेला ३ डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्या महिलेची २१ लाख रुपये किमतीची एसयूव्ही हिसकावून घेतल्याचा आरोपही भोसलेवर आहे. सतीश, राजे वीर आणि वीरेंद्रसिंह बाळासाहेब भोसले अशी नावे वापरणाऱ्या भोसले यांच्यावर यापूर्वी फसवणूक आणि खंडणीचे ११ गुन्हे दाखल आहेत. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तो प्रामुख्याने घटस्फोटित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत पार्श्वभूमी असलेल्या महिलांना लक्ष्य करत होता. तो भावनिकदृष्ट्या कमकुवत अशा स्त्रियांना त्रास देत होता तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांनाही तो अडकवत होता.”