ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून जोरदार टीका केली आहे. शनिवारी मुंबईत पार पडलेल्या तिरंगा रॅली सभेत ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मागासलेल्या मुस्लिमांसाठी आरक्षण तसंच वक्फच्या संपत्तींना सुरक्षा देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी एमआयएमच्या सभेला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडतंय का? असा सवालही केला.
ओवेसी यांनी यावेळी मुस्लीम तरुणांना तुमची मुलं गरीब आणि अशिक्षित राहावी अशी इच्छा आहे का? विचारणा केली. “ज्या तरुणांचं वय १८ ते १९ आहे त्यांचं लवकरच लग्न होईल. त्यांना मुलं होतील. तुम्ही लग्न करणार ना? तुमच्या मुलांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचे आहे का?,” असं ओवेसी म्हणाले.
अविवाहित तरुणांसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही लग्न करणार ना? बॅचलर राहू नका. बॅचलर खूप त्रास देतात. माणूस घऱात थांबला की डोकं शांत असतं”.
ओवेसी यांनी यावेळी महाराष्ट्रातील मुस्लिमांना मतदान करण्याआधी शिक्षण आणि उत्पन्न अशा विषयांवर विचार करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, ‘”महाराष्ट्रात ४.९ टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. २२ टक्के प्रायमरी, १३ टक्के सेकंडरी आणि ११ टक्के कॉलेजमध्ये आहेत. मुस्लिमांना शिकायचं आहे मात्र फी भरण्यासाठी पैसे नाहीत. दुसरीकडे आरएसएस मुस्लिमांमध्ये शिकण्याची इच्छा नाही असं खोटं सांगतं”.
“तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बुस्टर डोस हा कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा असू शकत नाही. बुस्टर डोससाठी एम-आरएनएच्या (M-RNA) केवळ फायझर किंवा मॉडर्ना लसीच असतील. असं असताना मोदी देश चालवत आहेत, पण फायझर आणि मॉडर्नासोबत भांडण सुरू आहे. करोनाची तिसरी लाट येऊ नये असंच आम्हाला ही वाटतं, पण बुस्टर डोस लावणं सरकारचं काम आहे. मी तर मुस्लिमांमध्ये बुस्टर डोस लावूनच थांबणार आहे,” असं असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं.
“नागपूरमध्ये विधानसभेचं अधिवेशन होणार आहे. एमआयएमच्या आमदारांनी तेथे आंदोलनाचं नियोजन केल्यास मी तिथंही येण्यास तयार आहे. जेव्हा विधानसभेत सर्व आमदार एकत्र बसू शकतात तेव्हा ओमायक्रॉन दिसणार नाही,” असंही मत व्यक्त केलं.
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “प्राथमिक शाळेत २३ टक्के मुस्लीम मुली आहेत, माध्यमिक शाळेत येईपर्यंत ही संख्या १२ टक्के होते. दहावीपर्यंत ११ टक्के, उच्च माध्यमिकपर्यंत ६ टक्के असं प्रमाण खाली जात आहे. असं असतानाही कुणीच आरक्षणाविषयी बोलणार नाही. ही माझी आकडेवारी नाही, तर महाराष्ट्र सरकारची आकडेवारी आहे. महाराष्ट्रात ८३ टक्के मुस्लिमांकडे जमीन नाही. ते भूमिहीन आहेत. दुसरीकडे केवळ १ टक्के मराठ्यांकडे जमीन नाही. १ टक्के आणि ८३ टक्के यात सांगा कोणता न्याय आहे?”
“शरद पवार यांचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार आहे का? उद्धव ठाकरे यांचं मन काय केवळ मराठ्यांसाठी धडधडणार आहे का? काँग्रेसचं मन केवळ मराठ्यांसाठी धडधडणार आहे का? न्याय कमकुवतांसोबत झाला पाहिजे, मजबुत असणाऱ्यांबरोबर नाही. न्याय करताना जो जमिनीवर पडलाय त्याच्यावर चर्चा व्हायला हवी. जे आधीच आकाशात आहेत त्यांना आणखी वर कुठं घेऊन जाणार आहात? मात्र हे बोलणार नाहीत,” असं ओवेसी यांनी सांगितलं.