मुंबई : करोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग जगभरात वेगाने पसरत असल्यामुळे पालिका प्रशासन दक्ष झाले आहे. विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवरील कारवाईही वाढली असून दिवसाला पालिकेकडून पाच हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर पोलीस प्रशासनालाही कारवाईचे अधिकार दिले असून पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईलाही वेग आला आहे. पालिकेच्या यंत्रणेने एप्रिल २०२० पासून ६६ कोटींचा दंड वसूल केला आहे.
ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. करोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून पुन्हा निर्बंध काहीसे कडक केले जात आहे. नववर्षाच्या स्वागताच्या मेजवान्यांवर पालिका आयुक्तांनी बंधने घातली आहेत. करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले जात आहे. तरीही विनामुखपट्ट्या फिरणाऱ्या सुमारे चार ते पाच हजार लोकांना दर दिवशी दंड केला जातो.
पालिकेने आतापर्यंत ६६ कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. विनामुखपट्टी फिरणाऱ्यांकडून दंडवसुली करण्याचे अधिकार पोलिसांनाही देण्यात आले असून पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईने वेग घेतला आहे. दर दिवशी पोलिसांकडून सुमारे तीन हजार लोकांवर कारवाई होत आहे. त्यामुळे दिवसभरात एकूण सात ते आठ हजार लोकांवर कारवाई होत असते. पोलीस प्रशासनाने आतापर्यंत ७ लाख ४५ हजार ११५ लोकांवर कारवाई करून १४ कोटी ९० लाखांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या दीड वर्षात…
क्लीन अप मार्शलने पकडलेले नागरिक
३३ लाख २७ हजार ०३६
वसूल केलेला एकूण दंड
६६ कोटी ३ लाख ३७ हजार ७७१
पोलिसांनी पकडलेली एकूण प्रकरणे
७ लाख ४५ हजार ११५