मुंबई : मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासाठी ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती दिली जात आहे. रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेऊन रुळांसह अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यावर भर दिला. या कामासाठी लोकल फेऱ्यांबरोबरच मेल, एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे काहीसे हाल झाले. याच मार्गिकेच्या कामासाठी या महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी २०२२मध्ये ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून सुरू आहे. त्यावेळीही अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत राहणार आहे.
ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या रुळांच्या कामांसाठी रविवारी सकाळी ८ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले होते. या कामासाठी ५०० कामगार, तर मध्य रेल्वे, एमआरव्हीसीचे १०० पर्यवेक्षक आणि अधिकारी कार्यरत होते. मार्गिकेवर चार विविध ठिकाणी कामे सुरू होती. कामे मार्गी लावण्यासाठी लोकलची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या आणि अर्ध जलद लोकल दिवा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर, तर सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या आणि अर्ध जलद लोकल मुलुंड ते दिवा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात आल्या. त्यामुळे मुंब्रा आणि कळवा स्थानकात लोकल गाड्यांना थांबा देण्यात आला नव्हता.
कळवा स्थानकातील प्रवासी लोकल पकडण्यासाठी ठाणे स्थानकापर्यंत येण्यासाठी रुळाचा वापर करत होते, तर काही जण रिक्षाने स्थानक गाठत होते. मुंब्य्रातील प्रवाशांना यासाठी काहीसा मनस्ताप सहन करावा लागला. ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस प्रवाशांचे मात्र हाल झाले. मुंबई ते पुणे, नाशिकसह अन्य मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना खासगी प्रवासी बसगाड्यांवर अवलंबून राहावे लागले.
नवीन बोगद्यातून गाड्या धावणार
या मार्गिकेचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी कळवा ते मुंब्रा डाऊन धिम्या मार्गावरील उपनगरीय लोकल १८ तासांच्या ब्लॉकनंतर सोमवारपासून (२० डिसेंबर) नवीन मार्ग आणि १.६ किलोमीटर लांबीच्या नवीन बोगद्यातून चालवण्यात येणार आहे. बोगद्यातून बाहेर पडल्यावर गाड्या सध्याच्या डाऊन धिम्या मार्गावर धावतील. अप धिम्या मार्गावरही मुंब्रा ते कळवा दरम्यान गाडी चालवताना नवीन मार्ग आणि बोगद्यातून गाडी चालवण्यात येईल. ठाणे ते दिवा पाचवा आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत लोकलसाठी हा तात्पुरता मार्ग असेल.