मुंबई : तिकीट व पाससाठीचा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२२ पासून ‘चलो स्मार्ट कार्ड’ प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे कार्ड सुरुवातीला कुलाबा आणि वडाळा आगारातून उपलब्ध होईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. या कार्डची किंमत ७० रुपये असेल. ३ हजार रुपयांपर्यंत कार्ड रिचार्ज करता येईल. वाहकाकडे असलेल्या यंत्राद्वारे ते टॅब करता येईल आणि प्रवासासाठी लागणारे तिकीट शुल्क या कार्डमधून अदा होणार आहे. बेस्टच्या ‘चलो’ मोबाइल अॅपद्वारे किंवा ऑनलाइनही ते रिचार्ज करत येईल. हे कार्ड जरी वापरले नाही, तरीही ते मुदतबाह्य होणार नाही. उपक्रमाने सुरू केलेल्या तिकीट आणि पाससाठीच्या ७२ सुपर सेव्हर योजनेचाही यातून लाभ घेता येणार आहे. आधीच बेस्टने प्रवाशांसाठी चलो मोबाईल अॅपही सुरु केले आहे. यातूनही तिकीट व पास काढतानाच बसची सद्यस्थिती, बसमधील गर्दी, आसनव्यवस्था इत्यादी माहिती मिळू शकेल.