मुंबई : डिसेंबरमध्ये राज्यात १ लाख ३७ हजार ४१० घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीतून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्याला २ हजार ३५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये १ लाख ४ हजार १४ घरांची विक्री झाली होती आणि यातून १ हजार ६७६ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. त्यामुळे नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये घरविक्री आणि महसूलात वाढ झाली आहे. मात्र २०२० डिसेंबरच्या तुलनेत २०२१ मधील घरविक्रीत मोठी घट झालेली दिसते आहे.
करोनाचा फटका बसल्याने २०२० च्या सुरुवातीस घरविक्रीत मोठी घट झाली. एप्रिल २०२० मध्ये तर आतापर्यंतची सर्वात कमी, केवळ ७७८ घरे विकली गेली होती. तर यातून केवळ ३ कोटी ११ लाख रुपये इतका आतापर्यंतचा सर्वात कमी महसूल मिळाला होता. करोना टाळेबंदीचा बसणारा हा फटका लक्षात घेता राज्य सरकारने महसूल वाढविण्यासाठी सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्क दरात मोठी कपात केली. याचा मोठा फायदा घरविक्रीला झाला. त्यामुळेच कधी नव्हे ते डिसेंबरमध्ये विक्रमी अशी घरविक्री झाली. डिसेंबर २०२० मध्ये २ लाख ५५ हजार ५१० घरे विकली गेली होती आणि यातून २ हजार २१२ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. एका महिन्यातील सर्वाधिक अशी ही घरविक्री होती.
पुढे २०२१च्या सुरुवातीलाही मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा झाला. त्यामुळेच आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी महसूल मार्च २०२१ मध्ये राज्याला मिळाला होता. मार्चमध्ये २ लाख १३ हजार ४१३ घरे विकली गेली होती आणि यातून तब्बल ९ हजार ६६ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. एका महिन्यांत घरविक्रीतून मिळालेला हा सर्वाधिक विक्रमी असा महसूल होता. पण त्यानंतर, मार्चनंतर मात्र मुद्रांक शुल्क दरातील सवलत संपुष्टात आली. परिणामी घरविक्रीतही घट होत गेली. घरविक्री आणि महसूल वाढविण्यासाठी पुन्हा मुद्रांक शुल्क दरसवलत द्यावी अशी मागणी सातत्याने बांधकाम व्यावसायिकांकडून, संघटनांकडून होत आहे. पण मागणी मान्य होताना दिसत नाही. त्यामुळेच घरविक्रीत म्हणावी तशी वाढ होताना दिसत नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिसेंबर २०२१ मधील घरविक्रीचे आकडे हेच अधोरेखित करत असल्याचे म्हणत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा मुद्रांक शुल्क दर सवलती लागू करण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा उचलून धरली आहे.
मुंबईत वर्षभरात १ लाख ११ हजार घरांची विक्री
डिसेंबरमध्ये मुंबईत ९ हजार ६१९ घरांची विक्री झाली असून यात ७५५ कोटींचा महसूल मिळाला आहे. डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिसेंबर २०२१ मध्ये घट झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये मुंबईतही विक्रमी अशी घरविक्री झाली होती. या एका महिन्यांत तब्बल १९ हजार ५८४ घरे विकली गेली होती. तर यातून ६८० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. डिसेंबर २०२१ मध्ये ७५५ कोटींचा महसूल मिळाला असला तरी घरविक्री मात्र घटली आहे. मात्र त्याचवेळी २०२१ मधील पूर्ण वर्षभराची घरविक्री मात्र बांधकाम क्षेत्रासाठी दिलासादायक म्हणावी लागेल. कारण एका वर्षांत मुंबईतील घरविक्रीने १ लाखांचा पल्ला पार केला आहे. पूर्ण वर्षांत १ लाख ११ हजारांहून अधिक घरे विकली गेली असून यातून ६ हजार कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. मागील दहा वर्षांत तरी एका वर्षांच्या काळात कधीही एक लाखाच्या पुढे घरविक्री झाली नव्हती.