मुंबई : अमेरिकेतील प्रसिद्ध विद्युत कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी भारतात सरकारी आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मस्क यांना आवतण दिले़ ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी पाटील यांनी दिली.
‘टेस्ला’चे उत्पादन भारतात आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एलॉन मस्क यांनी सध्या सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून, उत्पादनाच्या प्रारंभाची वेळ सांगू शकत नाही, असे उत्तर दिले होते. मस्क यांच्या या विधानानंतर केंद्रातील अधिकाऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. भारतातील उत्पादनासाठी वचनबद्धता जाहीर केल्याशिवाय ‘टेस्ला’ शुल्क कपातीची मागणी करू शकत नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार व ‘टेस्ला’मधील या शाब्दिक चकमकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत मस्क यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतशील राज्यांपैकी एक असून ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे जयंत पाटील यांनी मस्क यांना उद्देशून लिहिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. जयंत पाटील यांनी या ट्विटद्वारे एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपवर कुरघोडी करताना ‘टेस्ला’ची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. ‘टेस्ला’सारखी कंपनी महाराष्ट्राचीच निवड करेल, असे वाटत असताना कार्यालयासाठी मस्क यांनी बंगळुरूची निवड केल्याने ‘टेस्ला’चा प्रकल्प भाजपची सत्ता असलेल्या राज्यातच जाणार असे वातावरण तयार झाले होते. पण मस्क यांच्या ट्विटमुळे इतर राज्यांना गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी मिळाली. जयंत पाटील यांनी ती संधी साधत मस्क यांना निमंत्रण दिले.
राज्यांमध्ये रस्सीखेच
‘टेस्ला’च्या प्रकल्पासाठी विविध राज्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे़ महाराष्ट्राने ‘टेस्ला’साठी दरवाजे खुले केले असताना, तेलंगणचे मंत्री
के़ टी़ रामाराव यांनीही मस्क यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले आहे. तेलंगणमध्ये उद्योग उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची हमी त्यांनी ट्विटद्वारे दिली़