रेल्वे प्रशासनाने कल्याण, डोंबिवलीसह इतर भागातील रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना घरं रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. यानंतर कल्याण पूर्वचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे नागरिकांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे जोपर्यंत रेल्वे प्रशासन येथील लोकांचे पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत याठिकाणी कारवाई होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे. तसेच, या झोपडीधारकांची भेटही खासदार शिंदे यांनी घेतली. यावेळी एका वयस्कर महिलेने आपले गाऱ्हाणे मांडत आम्ही गोळ्य़ा झेलू मात्र घरं रिकामी करून देणार नसल्याचे सांगितले. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी तुम्ही का गोळ्या झेलाल आम्ही आहोत ना, आम्ही गोळ्या झेलू असं बोलून दाखवलं. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार राजू पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, “काल खासदार इथे कल्याणला जे रेल्वेमध्ये बाधित होत आहेत, तिथे जाऊन आले आणि त्यांनी तिथे घोषणाही केली की आम्ही गोळ्या देखील अंगार झेलू. परंतु यांना बेघर होऊ देणार नाही. या अनुषंगानेच मी ट्विट केलेलं आहे की, जेव्हा दिवा मधील लोकांना तुम्ही दिवाळीच्या तोंडावर बेघर केलेलं आहे. अटाळीचे लोक लोक १५-२० दिवस झाले उपोषणास बसलेले आहेत, त्यांची दखल घेत नाहीत तुम्ही, जे लोक रिंग रोडमध्ये बाधित होत आहेत. पत्री पुलाचा जो ९० फुटी रोड मी जेव्हा तो जोडून दिला, त्यात जे बाधित झालेले आहेत. त्यातले शिवसैनिक आहेत, त्याला तुम्ही घर नाही दिलं आणि कसल्या वल्गना करताय.”
तसेच, “रेल्वेने नोटिसा बजावलेल्या झोपडीधारकांच्या पाठीशी प्रत्येकजण आहे. मग ते मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे असोत. मनसेचाही या झोपडीधारकांना पाठिंबा आहे. या अशा तिथे जाऊन वल्गना करण्यापेक्षा सरकार तुमचे आहे, तुम्ही रेल्वेवर उतरा. तुमच्या हाती प्रशासकीय यंत्रणा आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं आहे? अगोदर आपल्या पदरात झाकून पहा. आपण स्वत: लोकासाठी काय करतोय आणि मग गोळया झेलण्याच्या वल्गना करा.” असं राजू पाटील म्हणाले.
याचबरोबर, “निवडणूका आल्या की लोकांना घाबरावचे, त्यांना मजबूर करायचे आणि मग मतं गोळा करायची हे धंदे आत्ता सुरु झालेत. माझा लोकानाही सल्ला आहे की, अशांना बळी पडू नका. ही घरे तुमची तूटणार नाही. मनसेचा नेता म्हणून आश्वासीत करतो. आम्ही स्वत:ही त्याठिकाणी भेट देणार आहोत. परंतू अशा यात लोकांना अडकवून राजकारण कोणी करु नये या मताचा मी आहे.” असंही यावेळी आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.
“रेल्वेला त्यांची जागा रिकामी करून हवी असेल तर त्यांनी अगोदर पुनर्वसन धोरण तयार केलं पाहिजे. त्याशिवाय इथली घरं रिकामी होणार नाहीत. आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे असून उद्या जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला.