मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट आहे. तर,मुंबईत (Mumbai) रविवारी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. हवामानातील बदल मुंबईकरांना अनुभवयाला मिळाला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पांढऱ्या रंगाची (White Powder layer) चादर पसरलेली पाहायला मिळाली. बलूचिस्तानमधून आलेल्या वादळानं मुंबई आणि पुण्यावर धुळीची चादर पाहायला मिळाली. थंडीची लाट (Cold Wave) आणि पावसाच्या हलक्या सरीमुळं मुंबईतील कमाल तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत रविवारी दृश्यमानता देखील कमी झाली होती. हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार रविवारी सांताक्रुझ येथील वेधशाळेत 23.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी कमाल तापमान आहे.
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या बलुचिस्तानातून आलेल्या वाऱ्यामुळं पांढरी धूळ मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळाली आहे. बलुचिस्तानहून आलेल्या वाऱ्यामुळं सौराष्ट्र, मुंबई आणि कोकणात या ठिकाणी पांढरी पावडर पाहायला मिळाली.
मुंबईत रविवारी चोवीस तासात गेल्या दहा वर्षातील कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथील वेधशाळेत याची नोंद झाली आहे. कुलाबा येथं 24 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं तर सांताक्रुझ येथे 23.8 अंश तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे 5.8 अंश आणि 6.9 अंश कमी नोंदवलं गेलं आहे. गेल्यावर्षीचं कमी कमाल तापमान 28.8 अंश तापमानाची नोंद झाली होती.
रविवारी रात्रीच्या वेळी कुलाबा येथे 21.6 अंश आणि सांताक्रुझ येथे 21 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर, पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळानं राज्यात मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे.
मुंबईतीलदुचाकी, चारचाकी आणि घरांवर पांढऱ्या पावडरचं साम्राज्य दिसून आलं. त्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत भर पडलीय. ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय.